
( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Veen Doghatli Hi Tutena: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. लवकरच स्वानंदी समरला गुड न्यूज देणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आतापर्यंत स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र, प्रत्येक संकटात दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या या जोडीच्या आयुष्यात आता आनंदाची चाहूल लागल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
मालिकेत यापूर्वी स्वानंदीला तिच्या वयावरून टोमणे ऐकावे लागले होते. वय वाढल्यामुळे तिला मूल होणार नाही, असं म्हणत काही स्त्रिया तिला बोल लावताना दिसल्या होत्या. या बोलण्यामुळे स्वानंदी दुखावली होती. अशा कठीण प्रसंगी समरने तिची समजूत काढत तिला आधार दिला होता.
आता मात्र स्वानंदीच्या आयुष्यात खरंच आनंदाची बातमी येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
स्वानंदीच्या हातात दिसलं प्रेग्नन्सी टेस्ट किट
झी मराठीने सोशल मीडियावर मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये समर खोलीत येतो आणि स्वानंदीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, स्वानंदी काहीतरी लपवताना दिसते. नेमकं काय लपवलं आहे, हे जाणून घेण्यासाठी समर तिच्या मागे जातो.
याच गडबडीत स्वानंदीच्या हातातून प्रेग्नन्सी टेस्ट किट खाली पडतं. ते पाहून समर आश्चर्याने आणि आनंदाने तिला विचारतो, “प्रेग्नन्सी टेस्ट किट? आपल्याला बाळ होणार?”
त्यावर स्वानंदी म्हणते, “असं वाटतंय, आधी टेस्ट करून बघू.” यानंतर ती टेस्ट करण्यासाठी जाते. मात्र, बाहेर समरची उत्सुकता शिगेला पोहोचते. तो अस्वस्थ होऊन खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारताना दिसतो.
स्वानंदी खरंच समरला गुड न्यूज देणार का आणि प्रेग्नन्सी टेस्टमध्ये का रिजल्ट येणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने ‘स्वानंदी देणार समरला गुड न्यूज’ असं कॅप्शन दिलं आहे. आता स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू होणार का, हे आगामी भागातच स्पष्ट होईल.