
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi Serials: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र सणाची तयारी सुरू आहे. अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांमध्येही नवनवीन वळणं पाहायला मिळणार आहेत. कुठे प्रेमाच्या नात्याला नवी दिशा मिळणार आहे, तर कुठे नात्यांमधील गैरसमज आणि दुरावा वाढताना दिसणार आहे. काही मालिकांमध्ये जुन्या रहस्यांचा उलगडा होण्याची चिन्हं आहेत, तर काही पात्रांच्या आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत. चला तर मग, जाणून घेऊया झी मराठीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘दीपज्योती’ आणि ‘तारिणी’ या मालिकांच्या आगामी भागांत काय पाहायला मिळणार आहे.
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत शंकर आणि जिगिशा यांच्यातील जवळीक वाढत असल्यामुळे गौरीच्या मनात शंकरला गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वतःच्या भावना नाकारण्याचा प्रयत्न करत असतानाच शंकरचा वाढता दुरावा तिला अधिक अस्वस्थ करत आहे. दुसरीकडे, स्वतःचा आनंद आणि आईची इच्छा यांमध्ये अडकलेली शारदा कोणता निर्णय घेणार, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
शंकर आणि जिगिशा यांचं पोस्टर पाहिल्यानंतर मातोश्री दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे शंकर आणि गौरी यांच्यातील अंतर आणखी वाढताना दिसत आहे. दसऱ्याच्या दिवशी कृष्णाई आपल्या मुलीला घेऊन, तर मातोश्री शंकरला घेऊन महालक्ष्मी मंदिरात जातात. तिथे दोघांची भेट होता होता राहते. मात्र, शंकरच्या हातून मातोश्रींनी त्याच्या पत्नीसाठी आणलेलं कुंकू गौरीच्या कपाळावर पडतं. या अनपेक्षित घटनेमुळे गौरीच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये स्वानंदी उघड करणार सत्य
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी अंशुमनचं सत्य समरसमोर आणणार आहे. अंशुमनने बाबांना कामासाठी ड्रायव्हर म्हणून ठेवलं असून त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याचं स्वानंदी समरला सांगणार आहे. त्यामुळे समरची यावर काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे, फॅशन शोसाठी अधिराला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कमी बजेटमुळे कोणतीही मॉडेल तिच्यासोबत काम करण्यास तयार नाही. अशा वेळी स्वानंदी तिच्या मदतीला धावून येते. ती झी मराठीच्या प्रमुख मालिकांमधील नायिकांना फॅशन शोमध्ये सहभागी करून घेते. स्वानंदीच्या या मदतीमुळे अधिराचा फॅशन शो कसा रंगणार आणि या घडामोडींचा पुढे काय परिणाम होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘दीपज्योती’मध्ये दीप-ज्योतीच्या नात्याला मिळणार नवी दिशा?
‘दीपज्योती’ मालिकेत स्वराजच्या भूतकाळातील एक घटना पुन्हा त्याच्यासमोर उभी ठाकणार आहे. जुन्या हिट-अँड-रन अपघातात स्वराजचा सहभाग असल्याचं उघड करण्याची धमकी एका व्यक्तीकडून त्याला दिली जाते. आपल्या संसाराचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी स्वराज दीपची मदत घेतो. दीप वेगवेगळ्या धाग्यांचा मागोवा घेत ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान, गणपत काका सुलोचनाला दीपचं ज्योतीवर प्रेम असल्याचं सांगतात. दीपला त्रास होताना पाहून सुलोचनाला वाईट वाटतं. त्यामुळे ती ज्योतीच्या कुटुंबीयांची भेट घेते. दीपमध्ये पूर्वीपेक्षा चांगला बदल झाल्याचं ज्योतीचं कुटुंब मान्य करतं. यानंतर सुलोचना दीपच्या प्रेमाला मनापासून पाठिंबा देते आणि दोघांना एकत्र आणण्याचा निर्धार करते. मात्र, ज्योतीचं मन स्वतःच्या प्रयत्नांनी जिंकण्याचा दीपचा निर्णय कायम आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात पुढे काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
‘तारिणी’मध्ये मोठ्या रहस्याचा उलगडा होणार?
‘तारिणी’ मालिकेत रहस्य आणि थरार आणखी वाढणार आहे. केदारच्या आईच्या मृत्यूमागे पद्मिनीचा काहीतरी संबंध असल्याचं तारिणीच्या लक्षात येतं. त्यामुळे ती पद्मिनीवर संशय घेऊ लागते. दुसरीकडे, युवराज डॉ. कामत यांच्या मदतीने खांडेकर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचत आहे. डॉ. कामत यांनी दिलेली मोहीम पूर्ण करण्यासाठी युवराज प्रयत्नशील असतानाच टीम तारिणी त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करणार आहे.
याचदरम्यान, सुमी आजीला तारिणी ही गुप्त पोलीस अधिकारी असल्याचं समजणार आहे. या नव्या खुलाशामुळे खांडेकर कुटुंबाभोवतीचं रहस्य आणखी गडद होईल. तारिणी युवराज आणि डॉ. कामत यांचा डाव कसा उधळून लावणार, तसेच पद्मिनीबाबतचं सत्य काय असणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
प्रेम, गैरसमज, कौटुंबिक नाती, ब्लॅकमेलिंग आणि गुप्त मोहिमांमुळे झी मराठीच्या मालिकांमध्ये आगामी भागांत अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील. तेव्हा पाहायला विसरू नका, झी मराठीवरील आपल्या आवडत्या मालिका!