
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Mirzapur The Movie OTT: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम आणि थ्रिलर चित्रपटांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, जेव्हा पूर्वांचलच्या सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाची गोष्ट येते, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढते. असाच काहीसा अनुभव सध्या ‘मिर्झापूर: द मुव्ही’ या चित्रपटाबाबत पाहायला मिळत आहे. तब्बल साडेतीन तासांहून अधिक लांबीचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनानंतर अवघ्या २४ तासांतच या चित्रपटाने ट्रेंडिंग यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.
‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता हीच कथा मोठ्या पडद्यावर नव्या अंदाजात सादर करण्यात आली आहे. चित्रपटातील कलाकारांची फळी हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा कालीन भैय्याच्या भूमिकेत दिसतात, तर अली फजल गुड्डू पंडितच्या आक्रमक अंदाजात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो.
याशिवाय दिव्येंदूने मुन्ना भैय्या, श्वेता त्रिपाठीने गोलू गुप्ता आणि रसिका दुग्गलने बीना त्रिपाठी ही पात्रं साकारली आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटातून रवी किशनने बब्बन यादवच्या भूमिकेत पदार्पण केलं आहे. तर जितेंद्र कुमार बबलू पंडितच्या भूमिकेत दिसतो.
चित्रपटाची कथा मिर्झापूरच्या सिंहासनावर राज्य करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींमधील संघर्षाभोवती फिरते. कथेची सुरुवात २०१८ मध्ये होते. त्यावेळी कालीन भैय्या पूर्वांचलवर राज्य करत असतो. गुड्डू पंडित आणि बबलू पंडित त्याच्यासाठी काम करत असतात. दुसरीकडे, कालीन भैय्याचा मुलगा मुन्ना त्रिपाठी आपली ताकद दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.
मात्र, बब्बन यादवची एंट्री झाल्यानंतर कथेला वेगळं वळण मिळतं. त्याची नजरही मिर्झापूरच्या सिंहासनावर असते. त्यानंतर सुरू होतो सत्तेसाठीचा संघर्ष, कटकारस्थानं आणि रक्तरंजित खेळ. गुरमीत सिंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘मिर्झापूर: द मुव्ही’ हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी दुहेरी आकडी कमाई करत चित्रपटाने चांगली सुरुवात केली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने भारतात २३०.६४ कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरातील एकूण कमाई ३३९.४१ कोटी रुपयांवर पोहोचली. या कमाईच्या जोरावर चित्रपट सुपरहिट ठरल्याचं वृत्त आहे.
ओटीटीवर प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये नंबर १चित्रपटगृहांमध्ये यश मिळवल्यानंतर ‘मिर्झापूर: द मुव्ही’ आता ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट ३० ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर अवघ्या २४ तासांतच त्याने टॉप ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवलं. विशेष म्हणजे, देशभरात हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पुढील भागाचा संकेत देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे निर्माते ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा दुसरा भाग आणणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. IMDb वर या चित्रपटाला ७.३ रेटिंग मिळाल्याचंही सांगितलं जात आहे.