सौजन्य फोटो - सोशल मिडीया
गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील निवासस्थानी कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे CPR देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना वाचवता आले नाही. नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती मणिपाल रुग्णालयातील डॉ. शेखर सालकर यांनी दिली आहे. त्यानुसार, पहाटे सुमारे २.३० वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या मित्राला तब्येत ठीक नसल्याचा मेसेज केला होता. काही वेळाने मित्राने हा मेसेज पाहिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला आणि पहाटे सुमारे ४ वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचला.
मित्र घरी पोहोचला त्यावेळी नाना पाटेकर यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यांना घाम फुटला होता आणि प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यानंतर तातडीने मदत मिळवण्यासाठी त्यांच्या केअरटेकरशी संपर्क करण्यात आला. केअरटेकरने जवळच्या रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाची इमर्जन्सी टीम तातडीने नाना पाटेकर यांच्या घरी पोहोचली. डॉक्टरांनी घटनास्थळीच कार्डियाक मसाज आणि CPR सुरू केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतरही डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे ४५ मिनिटे सतत CPR देण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पहाटे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, हे प्रकरण मेडिको-लीगल केस म्हणून नोंदवण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. मृत्यूचे वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली. नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप उमटवली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.






