
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
यामध्ये सलमान खानचा बहुचर्चित रिॲलिटी शो ‘बिग बॉस २०’ हे या आठवड्यातील प्रमुख आकर्षण असणार आहे. याशिवाय तापसी पन्नूचा ‘गांधारी’, ‘द जेंटलमेन’चा दुसरा सीझन, ‘द हार्ड कॉर्प्स’, ‘द कोर्ट’ यांसह अनेक चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर पाहता येणार आहेत. पाहूया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोणते चित्रपट आणि शो कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.
या आठवड्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस २०’. सलमान खान पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस २०’चा प्रीमियर ६ सप्टेंबर २०२६ रोजी JioHotstar वर होणार आहे.
यंदाच्या सीझनमध्ये ‘करण-अर्जुन’ ट्विस्टसह अनेक अनोखे घटक पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच ‘वरदान’ ही संकल्पनाही यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.
डीसी
वामिका गब्बी आणि लोकेश कनगराज यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डीसी’ हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर आता ओटीटीवर येत आहे. अरुण मथेश्वरन दिग्दर्शित हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
आता हा चित्रपट ४ सप्टेंबरपासून Sun NXT वर स्ट्रीम होणार आहे. ‘डीसी’ तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध असेल. मात्र, हिंदी भाषिक प्रेक्षकांना यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
द कोर्ट
कोर्टरूम ड्रामा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘द कोर्ट’ ही तमिळ मालिका एक चांगला पर्याय ठरू शकते. या मालिकेची कथा याझिनी नावाच्या एका तरुण वकिलाभोवती फिरते. याझिनीला बोबडं बोलण्याची समस्या आहे, तर तिचे वडीलही नामांकित वकील आहेत.
एका टप्प्यावर याझिनीचा सामना स्वतःच्या वडिलांशी होतो आणि त्यानंतर कथेत अनेक रंजक वळणं येतात. ही मालिका ४ सप्टेंबर २०२६ पासून JioHotstar वर पाहता येणार आहे.
उन्मादम
‘उन्मादम’ हा मल्याळम भाषेतील मानसशास्त्रीय गुन्हेगारी थ्रिलर चित्रपट आहे. कुंचको बोबन आणि लिजोमोल जोस यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३१ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
आता हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ पासून SonyLIV वर स्ट्रीम होणार आहे. सिद्दीक, कृष्णा प्रभा, विशक नायर, सुधीश आणि सबुमन अब्दुसमद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. किरण दास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
गांधारी
तापसी पन्नूचा बहुप्रतीक्षित ‘गांधारी’ हा चित्रपटही सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. देवाशीष मखिजा दिग्दर्शित या चित्रपटात तापसीने एका आईची भूमिका साकारली आहे.
कथेतील तिच्या मुलीचं अपहरण होतं. त्यानंतर एका घटनेत तापसीच्या पात्राची दृष्टी जाते. मात्र, विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर ती आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी निघते. या चित्रपटात इश्वक, छाया कदम आणि स्वस्तिका मुखर्जी यांच्याही भूमिका आहेत. ‘गांधारी’ ३ सप्टेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
द जेंटलमेन सीझन २
ब्रिटिश कॉमेडी मालिका ‘द जेंटलमेन’चा दुसरा सीझनही या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या मालिकेचा दुसरा सीझन ३ सप्टेंबर रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
द हार्ड कॉर्प्स
अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘द हार्ड कॉर्प्स’ हा पर्याय आहे. या चित्रपटाची कथा एका माजी सैनिकाभोवती फिरते. इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धातून परतल्यानंतर त्याची एका चॅम्पियन बॉक्सरच्या सुरक्षेसाठी अंगरक्षक म्हणून नियुक्ती होते.
हा अॅक्शनपट ३ सप्टेंबर रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
स्टार वॉर्स: द मँडलोरियन अँड ग्रोगू
सायन्स फिक्शन चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ‘स्टार वॉर्स: द मँडलोरियन अँड ग्रोगू’ हा चित्रपट विशेष आकर्षण ठरणार आहे. यावर्षी मे महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘स्टार वॉर्स: द मँडलोरियन अँड ग्रोगू’ २ सप्टेंबरपासून JioHotstar वर स्ट्रीम होणार आहे.
एकूणच, सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना अॅक्शन, थ्रिलर, कॉमेडी, कोर्टरूम ड्रामा आणि रिॲलिटी शो अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे. त्यामुळे ओटीटीप्रेमींसाठी हा आठवडा नक्कीच खास ठरणार आहे.