
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Police Company: अभिनेता हर्षवर्धन राणे लवकरच एका दमदार क्राइम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘पोलीस कंपनी’ या चित्रपटात हर्षवर्धन राणे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री अश्विनी काळसेकर देखील दिसणार आहे.मुंबईतील अंडरवर्ल्डचा हिंसक काळ आणि पोलिसांच्या कारवायांवर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘पोलीस कंपनी’ हा चित्रपट मुंबई पोलिसांच्या स्पेशल एन्काउंटर स्क्वॉडच्या कारवायांवर केंद्रित असणार आहे. १९९७ ते २००४ या काळात मुंबईत अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव होता. या कालावधीत मुंबई पोलिसांच्या स्पेशल एन्काउंटर स्क्वॉडने जवळपास ३०० अंडरवर्ल्ड गुंडांना ठार केले होते. या पार्श्वभूमीवर चित्रपटात गुन्हेगारी विश्व, पोलिसांची कारवाई आणि त्या काळातील परिस्थिती उलगडण्यात येणार आहे.
हर्षवर्धन राणे साकारणार दया नायक
या चित्रपटात हर्षवर्धन राणे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेसाठी हर्षवर्धन राणे कोणता अंदाज सादर करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दया नायक यांच्या कारकिर्दीशी संबंधित घटनांमधून मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि पोलिस यंत्रणेतील संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात केला जाणार आहे.
चित्रपटात तगडी स्टारकास्ट
‘पोलीस कंपनी’मध्ये हर्षवर्धन राणे यांच्यासोबत फरदीन खान, फातिमा सना शेख, परेश रावल, सौरभ शुक्ला, मकरंद देशपांडे आणि अश्विनी काळसेकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अनुभवी कलाकारांची फळी आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डची पार्श्वभूमी यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
‘सत्या’ आणि ‘कंपनी’ यांसारख्या चित्रपटांतून मुंबईतील अंडरवर्ल्डचे वास्तववादी चित्रण करणारे राम गोपाल वर्मा आता ‘पोलीस कंपनी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा याच विश्वाकडे वळले आहेत. या चित्रपटातून पोलिस यंत्रणेची भूमिका आणि गुन्हेगारी जगताशी असलेला संघर्ष पडद्यावर मांडला जाणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि राम गोपाल वर्मा करत आहेत. टी-सीरीज फिल्म्स आणि आरजीव्ही कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होणारा हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा इतिहास, एन्काउंटर स्पेशालिस्टची कारकीर्द आणि दमदार कलाकारांचा अभिनय यांचा संगम ‘पोलीस कंपनी’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या क्राइम थ्रिलरकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.