(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ranbir Kapoor Ramayana Movie: भारतीय संस्कृती, परंपरा आणि समृद्ध कथाकथनाचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज झालेला ‘रामायण’ हा चित्रपट भारतीय सिनेमासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निर्माता नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं प्रदर्शन जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ५० हजार स्क्रीन्सवर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून भारतातील सर्वाधिक पूजनीय महागाथांपैकी एक असलेलं रामायण आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
‘रामायण’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नसून, भारतीय संस्कृती आणि सभ्यतेशी जोडलेली कालातीत कथा मोठ्या पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न आहे. शौर्य, कर्तव्य, त्याग आणि धर्म-अधर्म यांच्यातील संघर्ष यांसारखी मूल्यं या महागाथेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे विविध देशांतील आणि वेगवेगळ्या पिढ्यांतील प्रेक्षकांनाही या कथेशी जोडता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चित्रपटाचं जगभरात होणारं प्रदर्शन भारतीय सिनेमाची वाढती आंतरराष्ट्रीय पोहोच अधोरेखित करतं. १०० हून अधिक देशांमध्ये आणि ५० हजार स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित झाल्यास भारतीय पौराणिक कथांना जागतिक स्तरावर सादर करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर यश रावणाच्या भूमिकेत
‘रामायण’च्या कलाकारांची फळीही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाची भव्यता, व्हिज्युअल्स आणि भारतीय महाकाव्याला आधुनिक चित्रपटनिर्मितीच्या माध्यमातून सादर करण्याची संकल्पना यामुळे या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांची महत्त्वाकांक्षी निर्मिती
‘रामायण’ची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने केली आहे. या प्रकल्पात डीएनईजी (DNEG) आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांचं सहकार्य लाभलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे.
भारतीय संस्कृतीच्या मुळांचा आणि रामायणाच्या मूळ भावनेचा आदर राखत, जागतिक दर्जाच्या चित्रपटनिर्मितीच्या माध्यमातून ही महागाथा नव्या पिढीसमोर मांडण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. चित्रपटाची निर्मिती दोन भागांमध्ये करण्यात आली असून, दोन्ही भागांच्या प्रदर्शनाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
‘रामायण’चा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपट आयमॅक्स (IMAX) फॉरमॅटमध्येही पाहता येणार आहे. भारताबाहेरील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सकडे, तर हिंदी भाषिक बाजारपेठेतील वितरणाची जबाबदारी धर्मा प्रॉडक्शन्सकडे असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय महाकाव्याची भव्यता जगभरातील प्रेक्षकांसमोर आणण्याच्या उद्देशाने तयार झालेला ‘रामायण’ भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा आहे. आता या महागाथेला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.






