
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Stranger Things: ओटीटी विश्वातील लोकप्रिय सायन्स फिक्शन मालिकांपैकी एक असलेल्या ‘स्ट्रेंजर थिंग्ज’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सने या लोकप्रिय फ्रँचायझीच्या नव्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे. ‘अदर वर्ल्ड्स: अ स्ट्रेंजर थिंग्ज ॲडव्हेंचर’ असं या नव्या मालिकेचं नाव असून ती २०२८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज डे’च्या निमित्ताने ६ नोव्हेंबर रोजी या मालिकेची घोषणा करण्यात आली. मालिकेच्या कथेनुसार, १९८३ मध्ये याच दिवशी विल बायर्स बेपत्ता झाला होता. त्यामुळे दरवर्षी ६ नोव्हेंबर हा दिवस ‘स्ट्रेंजर थिंग्ज डे’ म्हणून साजरा केला जातो.
‘अदर वर्ल्ड्स’ ही ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ फ्रँचायझीमधील चौथी निर्मिती ठरणार आहे. याआधी मूळ मालिका, ‘स्ट्रेंजर थिंग्ज: टेल्स फ्रॉम ‘८५’ ही ॲनिमेटेड स्पिन-ऑफ मालिका आणि ‘स्ट्रेंजर थिंग्ज: फर्स्ट शॅडो’ हे रंगमंचीय नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नव्या प्रीक्वेलचं कथानक १९५५ मधील नेवाडा येथील मॅरियन शहरात घडणार आहे. यात हेन्री क्रीलच्या आयुष्यातील असे अनुभव दाखवले जाणार आहेत, जे एका रहस्यमय परग्रही वस्तूच्या संपर्कात येण्यापूर्वीचे आहेत. याच वस्तूच्या संपर्कातून त्याला अलौकिक शक्ती मिळाल्याचं कथानकात दाखवलं जाणार आहे. त्यामुळे वेक्ना कसा घडला आणि त्याच्या शक्तींचं रहस्य काय, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कोण सांभाळणार मालिकेची जबाबदारी?
‘व्हरायटी’च्या वृत्तानुसार, या मालिकेची निर्मिती मॅट आणि रॉस डफर यांनी लेखिका केट ट्रेफी यांच्यासोबत केली आहे. केट ट्रेफी या मालिकेच्या शो-रनर आणि कार्यकारी निर्मात्या म्हणून काम पाहणार आहेत. तर जो राईट मालिकेच्या पहिल्या तीन भागांचं दिग्दर्शन करणार आहेत. याशिवाय शॉन लेव्ही, पॉल डिक्टर, शेली माइल्स, अँड्रिया स्पर्लिंग आणि पावलिना हुटोपिस हेही कार्यकारी निर्माते म्हणून सहभागी असतील. या मालिकेचं चित्रीकरण न्यू मेक्सिकोमध्ये होणार आहे.
मॅट आणि रॉस डफर यांनी या नव्या प्रोजेक्टबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘अदर वर्ल्ड्स’ची कल्पना ते अनेक वर्षांपासून मनात बाळगून होते. आता ती प्रत्यक्षात येत असल्याने त्यांना खूप आनंद होत आहे. ही मालिका ‘स्ट्रेंजर थिंग्ज’च्या विश्वाशी जोडलेली असली, तरी यात नवी ठिकाणं, नवे नायक आणि खलनायक पाहायला मिळणार आहेत.
तर शो-रनर केट ट्रेफी यांनीही या नव्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली. मूळ मालिकेतील गूढ, रहस्यमय आणि थरारक वातावरण पुन्हा अनुभवता येणार असून त्यासोबत एक नवीन कथा प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे २०२८ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या प्रीक्वेलची चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे.