(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Usha Uthup Birthday: बॉलिवूडच्या संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं कोणत्याही कलाकारासाठी सोपं नसतं. यासाठी अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि प्रतिभेची गरज असते. मात्र, काही कलाकार असे असतात, ज्यांची वेगळी ओळखच त्यांच्या यशाचं कारण ठरते. अशीच एक गायिका म्हणजे उषा उथुप! आपल्या भारदस्त आणि दमदार आवाजाने त्यांनी भारतीय संगीतविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे, ज्या आवाजामुळे आज त्या जगभरात प्रसिद्ध आहेत, त्याच आवाजामुळे एकेकाळी त्यांना शाळेतील संगीत वर्गातून बाहेर काढण्यात आलं होतं. चला जाणून घेऊया त्यांच्या संघर्षापासून यशापर्यंतचा रंजक प्रवास…
उषा उथुप यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबईतील एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांचं बालपण संगीताच्या वातावरणात गेलं. त्यांच्या आई-वडिलांना भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच पाश्चात्य संगीताचीही आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच उषा यांना गाण्याची गोडी लागली. त्यांनी मुंबईतील बायकुला येथील सेंट ॲग्नेस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. शाळेत असतानाच त्यांना गाण्याची आवड होती. मात्र, त्यांचा आवाज इतर मुलींपेक्षा खूप वेगळा आणि भारदस्त होता. याच कारणामुळे एकदा त्यांना शाळेतील संगीत वर्गातून काढून टाकण्यात आलं होतं.
मात्र, त्यांच्या संगीत शिक्षकांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली होती. त्यामुळे त्यांना गाण्याऐवजी क्लॅपर आणि त्रिकोण यांसारखी वाद्ये वाजवण्याची संधी देण्यात आली. संगीताचं औपचारिक प्रशिक्षण नसतानाही उषा यांचं संगीतावरील प्रेम कमी झालं नाही.
वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा गायले गाणे
उषा उथुप यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात गाणं गायलं. त्यांच्या बहिणींनाही संगीताची आवड होती. त्यांच्यामार्फत उषा यांची भेट प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्याशी झाली. त्यांनी उषा यांना रेडिओ सिलोनच्या ‘ओव्हलटीन म्युझिक अवर’ या कार्यक्रमात गाण्याची संधी दिली. या कार्यक्रमात त्यांनी ‘मॉकिंगबर्ड हिल’ हे गाणं सादर केलं. अशाप्रकारे त्यांच्या संगीतप्रवासाला सुरुवात झाली.
नाइट क्लबमध्ये गाण्यापासून केली सुरुवात
उषा उथुप यांच्या व्यावसायिक संगीत कारकिर्दीची सुरुवात १९६९ मध्ये चेन्नई येथून झाली. त्यांनी तिथल्या ‘नाइन जेम्स’ नावाच्या नाइट क्लबमध्ये गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याVandana Gupte: पहिला खून माझाच होईल!’ वंदना गुप्तेंच्या पतीचा मिश्कील टोला; बाळासाहेबांशी जोडलेला किस्सा चर्चेतमुळे क्लबच्या मालकाने त्यांना सलग आठवडाभर गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी कोलकाता, दिल्ली आणि मुंबईतील अनेक नाइट क्लबमध्ये आपले कार्यक्रम सादर केले. कोलकाता येथेच त्यांची भेट जानी चाको उथुप यांच्याशी झाली. पुढे दोघांनी लग्न केलं.
नाइट क्लबमधील कार्यक्रमांनंतर उषा उथुप यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवली. १९७० मध्ये ‘बॉम्बे टॉकी’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. त्यानंतर ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटासाठीही त्यांनी गाणी गायली. आर. डी. बर्मन आणि बप्पी लाहिरी यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
‘रंभा हो हो हो’, ‘मेहबूबा मेहबूबा’ आणि ‘डार्लिंग’ यांसारख्या गाण्यांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. पॉप, जॅझ, रॉक आणि चित्रपट संगीत अशा विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची छाप उमटवली. एकेकाळी ज्या आवाजामुळे त्यांना शाळेतील संगीत वर्गातून बाहेर पडावं लागलं होतं, त्याच आवाजाने पुढे त्यांना संगीतविश्वात वेगळी ओळख मिळवून दिली. आज उषा उथुप यांचा प्रवास अनेक नवोदित गायकांसाठी प्रेरणादायी ठरतो.






