
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Madhuri Dixit Jamal Kudu Dance: बॉलिवूडची धकधक गर्ल आणि ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही आपल्या अभिनयासोबतच नृत्याने चाहत्यांना घायाळ करते. तिच्या नृत्याची आणि अदाकारीची जादू आजही कायम आहे. नुकतीच माधुरीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घरी आयोजित दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी तिने पार्टीत चांगलीच धमाल केली. विशेष म्हणजे, या पार्टीतील तिचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी ‘ॲनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलची प्रसिद्ध ‘जमाल कुडू’ डान्स स्टेप करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित जांभळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. यावेळी तिने डोक्यावर ग्लास ठेवून ‘जमाल कुडू’ गाण्याची हुक स्टेप केली. विशेष म्हणजे, नृत्य करताना तिने डोक्यावरील ग्लासचा तोलही उत्तम प्रकारे सांभाळला. तिच्या या डान्समधील सहजता आणि अदाकारी पाहून चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत. वयाच्या ५९ व्या वर्षीदेखील माधुरीचा उत्साह आणि नृत्याची आवड पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
नेटकरी म्हणाले, ‘फिमेल बॉबी देओल’
माधुरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच त्यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. एका युझरने ‘व्वा, ती हे सुद्धा करू शकते’ अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या चाहत्याने ‘किती अद्भुत स्त्री आहे’ असं म्हणत तिचं कौतुक केलं. काही नेटकऱ्यांनी तर माधुरीच्या या डान्सला ‘ॲनिमल’ चित्रपटाची स्त्रीवादी आवृत्ती म्हटलं आहे. तिच्या या परफॉर्मन्सवर अनेकांनी ‘फिमेल बॉबी’ अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटात बॉबी देओलने अबरार हक ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची एन्ट्री आणि डोक्यावर ग्लास ठेवून केलेला डान्स प्रचंड लोकप्रिय झाला होता. ‘जमाल कुडू’ हे गाणं आणि त्यातील हुक स्टेप सोशल मीडियावर ट्रेंड झाली होती. अनेक सामान्य लोकांसह सेलिब्रिटींनीही ही स्टेप करून पाहिली होती. आता माधुरी दीक्षितने आपल्या खास अंदाजात ही स्टेप सादर केल्यामुळे तिचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.