
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या कथांसोबतच चित्रपटांच्या गाण्यांचीही जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असला तरी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात ती त्यातील गाणी. अशाच चर्चेत असलेल्या आगामी ‘स्वप्न सुंदरी’ या चित्रपटाच्या कव्हर साँगसाठी लोकप्रिय गायक अभिजीत सावंत याने आवाज दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन दशकांपासून मराठी आणि हिंदी संगीतविश्वात आपल्या आवाजाची जादू कायम ठेवणारा अभिजीत सावंत पुन्हा एकदा नव्या गाण्याद्वारे रसिकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ मधील ‘सर सुखाची श्रावणी’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सखे गं साजणी’ चित्रपटाच्या कव्हर साँगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता ‘स्वप्न सुंदरी’च्या निमित्ताने अभिजीतचा आणखी एक सुरेल प्रयोग संगीतप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
इंडियन आयडॉलच्या मंचावरून सुरू झालेला अभिजीत सावंतचा प्रवास आजही तितक्याच दमदारपणे सुरू आहे. गायक, रिअॅलिटी शो स्पर्धक, विजेता आणि विविध संगीत प्रकल्पांचा महत्त्वाचा भाग म्हणून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही त्याची अनेक गाणी चाहत्यांच्या ओठांवर कायम आहेत.
या नव्या गाण्याबाबत बोलताना अभिजीत म्हणाला, “माझ्या गाण्याची सुरुवात एका रिअॅलिटी शोमधून झाली आणि आज विविध प्रोजेक्ट्ससोबत हा प्रवास सुरू आहे, याचा खूप आनंद आहे. चित्रपटासाठी गाणं गाताना त्या चित्रपटाच्या नायकाचा आवाज बनण्याची जबाबदारी असते. कव्हर साँग करताना त्या चित्रपटातील पात्रं आपलीच आहेत, असं समजून गाणं सादर करावं लागतं. आजच्या तरुण पिढीला भावेल आणि त्यांच्या ट्रेंडनुसार काहीतरी वेगळं करण्याकडे माझा कायम कल असतो. ‘स्वप्न सुंदरी’चं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्याला नेहमीप्रमाणे प्रेम मिळेल, अशी आशा आहे.”
अभिजीत सावंतच्या आवाजाची जादू आजही देश-विदेशातील चाहत्यांमध्ये कायम आहे. त्यामुळे ‘स्वप्न सुंदरी’च्या कव्हर साँगबद्दलही संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.