हवामान बदलांमुळे तरूणांच्या मानसिक आरोग्याला हानी; आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदेदरम्यान तज्ञांचा दावा
सिडनी: अझरबैजानमधील बाकू येथे COP- 29 आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद सुरू आहे. या COP- 29 आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदेदरम्यान तज्ज्ञांनी हवामान बदलामुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.विविध देशांचे सरकारी प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. त्यांनी वातावरणातील बदलाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणामावर लक्ष्य देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
हवामान बदलामुळे तरूणांच्या मानसिकतेवर परिणाम
जलद हवामान बदल, उष्णतेत होणारी वाढ, आणि प्रदूषण यामुळे तरुणांच्या मनावर खोलवर परिणाम होत आहे, असा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांनी स्पष्ट केले की, विशेषत: मुले आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. यामुळे संपूर्ण परिषदेत खळबळ उडाली होती. तज्ज्ञांनी नमूद केलेल्या माहितीनुसार, उष्ण हवामान आणि आत्महत्येच्या विचारांमध्ये थेट संबंध आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे तरुणांमध्ये तणाव, चिंता आणि आघाताची भावना वाढत असून, अनेक वेळा त्यांना वैद्यकीय मदतीची गरज भासते.
अपुऱ्या उपाययोजनांमुळेही तरुणांमध्ये निराशा वाढत
तज्ञांना अभ्यासातून दिसून आले आहे की, वातावरणातील बदलामुळे तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालेले असून यावर लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये 2019 मध्ये झालेल्या विनाशकारी बुशफायरमुळे आणि त्यानंतर आलेल्या चक्रीवादळ, पूर अशा हवामानातील तात्काळ बदलांमुळे शेकडो कुटुंबांचे जीवन उध्वस्त झाले. या घटनांमुळे मुलांच्या शालेय शिक्षणात व्यत्यय आला, तर जबरदस्तीने विस्थापनामुळे मानसिक आरोग्यावर मोठा आघात झाला आहे.
तसेच, हवामान बदलामुळे अपुऱ्या उपाययोजनांमुळेही तरुणांमध्ये निराशा वाढत आहे. त्यांच्या भविष्याबद्दल असलेली अनिश्चितता त्यांच्यात अस्वस्थता निर्माण करत आहे. उष्ण हवामानाचे प्रमाण वाढल्यामुळे शाळा बंद होणे, आरोग्य सेवेतील अडथळे आणि रोजगाराच्या संधींवरही विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे तरुणांमध्ये आत्मघाती वर्तनाची शक्यता अधिक होत आहे.
हवामान बदल ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही
COP29 परिषदेतील नेत्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्यावर भर दिला आहे. तज्ञांनी स्पष्ट केले की, हवामान बदलांवर योग्य ती कारवाई न झाल्यास तरुणांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता आहे. शाश्वत उपाययोजना आणि मानसिक आरोग्य सेवा मजबूत करणे यावर भर देऊन तरुणांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. हवामान बदल ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून ती मानवी जीवनावर थेट परिणाम करणारी आहे, याची जाणीव जागतिक नेत्यांना करून देणे ही शिखर परिषदेची महत्त्वाची भूमिका ठरावी.