फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षी ८ मे रोजी ‘जागतिक अंडाशय कर्करोग दिन’ साजरा केला जातो. अंडाशयाचा कर्करोग हा महिलांच्या प्रजनन अवयवांपैकी महत्त्वाच्या अंडाशयात होतो, जिथे अंडी (स्त्रीबीज) तयार होतात. हा कर्करोग सुरुवातीला गुप्तपणे वाढतो आणि त्याची लक्षणं स्पष्टपणे दिसून येत नाहीत, त्यामुळे अनेक वेळा त्याचे निदान शेवटच्या टप्प्यात होते. अंडाशयाच्या कर्करोगाची काही ठळक लक्षणे म्हणजे पोट फुगणे, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल होणे. जोखीम घटकांमध्ये वय, कौटुंबिक इतिहास, तसेच बीआरसीए१ व बीआरसीए२ सारखे अनुवांशिक घटक महत्त्वाचे ठरतात. हे अनुवांशिक घटक पालकांकडून संक्रमित होऊ शकतात. तसेच, लिंच सिंड्रोम, कोलन व एंडोमेट्रियल कर्करोग यांसारख्या स्थितींमुळेही अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केकिन गाला म्हणाल्या, “स्तन, गर्भाशय मुख किंवा अंडाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.”
झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीप वोरा यांनी सांगितले की, “सध्या अंडाशयाच्या कर्करोगासाठी ठोस आणि विशिष्ट अशी कोणतीही प्राथमिक चाचणी उपलब्ध नाही. त्यामुळे या आजारासंदर्भात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः ज्या महिलांना कौटुंबिक इतिहास किंवा अनुवांशिक धोका आहे, त्यांनी तर अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले, “पेल्विक तपासणी, अल्ट्रासाऊंड इमेजिंग (विशेषतः ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड) आणि CA-125 रक्त चाचणी यांसारख्या उपाययोजनांद्वारे काही प्रमाणात निदान शक्य आहे, परंतु या चाचण्या प्रत्येक महिलेसाठी अचूक ठरतातच असे नाही. त्यामुळे लक्षणांची योग्य ती माहिती असणे आणि शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी नियमितपणे डॉक्टरांशी सल्लामसलत करावी आणि वेळोवेळी तपासण्या करून घ्याव्यात.” ते पुढे म्हणतात, “शिवाय धूम्रपान टाळणे, शरीराचे वजन योग्य मर्यादेत राखणे, संतुलित आहार घेणे आणि दररोज काही प्रमाणात शारीरिक हालचाल ठेवणे यांसारखे जीवनशैलीतील सकारात्मक बदलही कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.”
अशा प्रकारे, अंडाशयाच्या कर्करोगावर प्रभावीपणे मात करण्यासाठी अनुवांशिक माहितीची जाणीव, आरोग्यदायी जीवनशैली, नियमित वैद्यकीय तपासणी आणि आजाराबाबत जागरूक राहणे या चारही बाबींचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे.