बाडमेर : २६ वर्षांपूर्वी ज्या जुळ्या भावांनी (Brothers) एकाच नाळेतून जन्म घेतला होता, त्या दोन्ही जुळ्या भावांचा एकाच प्रकारे मृत्यू (Death) झाल्याची आश्चर्यकारक घटना राजस्थानात (Rajasthan) समोर आली आहे. ज्यावेळी या दोन्ही भावांचा एकसारखा मृत्यू झाला. त्यावेळी या दोघांमध्ये ९०० किलोमीटरचं अंतर होतं. हे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या राज्यात राहत होते. एका भावाचा छतावरुन घसरल्याने तर दुसऱ्या भावाचा पाण्यात घसरल्याने मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूत केवळ २४ तासांचं अंतर होतं. कुटुंबीयांनी या दोघांवरही त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार केले. या दोन्ही भावांची नावं होती सोहन सिंह आणि सुमेर सिंह.
नेमकं काय घडलं ?
बाडमेरचे रहिवासी असलेले हे दोन्ही भाऊ अडीच दशकांहून अधिक काळ एकमेकांसोबत होते. दोघांचे सुरुवातीचे शिक्षणही एकत्रच एकाचच शाळेत झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला भाऊ गुजरातच्या टेस्कटाईल कंपनीत नोकरीला होता. तर दुसरा भाऊ जयपूरमध्ये राहून शिक्षक भरतीसाठी अभ्यास करीत होता. गुजरातमध्ये राहणारा सुमेर बुधवारी छतावरुन फोनवर बोलत होता. त्यावेळी पाय घसरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. सूरतमध्येही घटना घडली. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सोहन सिंह घरी आला होता. गुरुवारी सकाळी पाण्याच्या टाकीत त्याचा पाय घसरला आणि तिथं त्याचा पाण्यात मृत्यू झाला.
भावाची मृत्यूवार्ता ऐकून आला होता घरी
सूरतमध्ये छतावरुन कोसळल्यानं सुमेरचा मृत्यू झाला. हे ऐकून त्याचा भाऊ सोहनला अतिव दु:ख झालं. जयपूरमध्ये अभ्यास करत असणारा सोहन घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याच्या टाकीत त्याचा पाय घसरला आणि तिथंच त्याचाही मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक दोन्ही तरुण भावांच्या मृत्यूमुळं कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरलीय. संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीत या दोन भावांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
सोहनचा मृत्यू की आत्महत्या?
जुळ्या भावाच्या मृत्युमुळं दुखी असलेल्या सोहननं आत्महत्या तर केली नसेल ना, याची चर्चाही होते आहे. पोलिसांनीही ही आत्महत्या नसेल, असा दावा अद्याप केलेला नाही. दोन्ही भावांच्या अशा अचानक एकत्र एक्झिटमुळं कुटुंब हवालदिल झालंय.