शिवसेना-मनसे एकत्र येणार? आदित्य ठाकरेंनी दिले संकेत, म्हणाले, महाराष्ट्र हितासाठी...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील काही जागांवर मनसेने उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटाचे काही आमदार निवडून आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरु असतानाच आज आदित्य ठाकरे यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे.
Sudhakar Badgujar: “… तर मी हा गुन्हा केलाय? हकालपट्टी होताच बडगुजर उद्धव ठाकरेंवर कडाडले
“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली आहे”, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील युतीबाबत वारंवार अनुकूलता दर्शवली आहे. मात्र मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेते अनुकूल नसल्याचं सांगितलं जात आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की “आम्ही आमच्या पक्षाकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना देखील व्यक्त केली आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी शिवसेनेसोबत तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. कालच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. हे त्याचंच एक उदाहरण आहे. राज्यातील जनतेच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचं मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्यासोबत यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांना सोबत घेऊन एकत्र लढू”, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
महायुतीमधील मोठा भाऊ कोण? मुंबई महापालिका निवडणूक ठरणार निर्णायक, संजय शिरसाटांचा भाजपला टोला
दरम्यान संजय राऊत यांनी देखील युतीवर भाष्य केलं आहे. “शिवसेना मनसेच्या युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेलं नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा देखील बोलून दाखवली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवरून त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल, असं म्हणत त्यांनीही युतीचे संकेत दिले आहे.