दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी! अरविंद केजरीवालांनी बोलावली पंजाबचे मुख्यमंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक
दिल्लीच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भाजपमध्ये प्रवेश करणार असून लवकरच आपचं पंजाबमधील सरकार कोसळेल, असा दावा कॉंग्रेसच्या नेत्याने केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल अलर्ट झाले असून आज त्यांनी भगवंत मान, सरकारी मंत्री आणि आमदारांची राजधानी दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे.
बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांशी संवाद साधला. केजरीवाल यांनी संभाषणात आमदारांना काय सांगितलं याची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र ज्या पद्धतीने घाईघाईत बैठक बोलावण्यात आली, त्यावरून निश्चित काहीतरी गंभीर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या हायकमांडचे इतर नेते चंदीगडला जाऊन बैठक घेऊ शकले असते, मात्र त्यांनी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांसह सर्व आमदारांना दिल्लीला बोलावलं. दिल्ली निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे. पक्षाच्या पराभवाबरोबरच या मोठ्या नेत्यांच्या पराभवामुळे हायकमांड कमकुवत झाला आहे. हायकमांड कमकुवत झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून, निकाल लागल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नेत्यांना लगेच फोन केला.
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आमदार आणि नेत्यांविरुद्ध सत्ताविरोधी लाट. दिल्ली निवडणुकीत ‘आप’ने मोठ्या संख्येने आमदारांची तिकिटे कापली. एवढंच नाही तर ज्या आमदारांची तिकीट कापली, त्यापैकी एक-दोन वगळता इतर सर्व आमदार भाजपमध्ये गेले. पंजाबमध्येही अनेक मुद्द्यांवर आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या ‘आप’ला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फक्त ३ जागा जिंकता आल्या. डिसेंबर २०२४ मध्ये पंजाबमध्ये नगरपालिका निवडणुका झाल्या, जिथे ‘आप’ने ५ पैकी फक्त ३ महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला. काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला होता.
दिल्लीत १९ जागांवर कॉंग्रेसच्या उमदेवाराला जितकी मतं मिळाली तेवढ्या मत फरकांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. या १९ जागांमध्ये अरविंद केजरीवाल यांची नवी दिल्ली आणि मनीष सिसोदिया यांच्या जंगपुरा जागेचाही समावेश आहे. आता ही भीती पंजाबमधील आम आदमी पक्षाला सतावत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची थेट स्पर्धा ‘आप’शी आहे. दुसरीकडे, शहरांमध्ये भाजपची मजबूत पकड आहे. २०२० च्या निवडणुकीत भाजपला पंजाबमध्ये ६.६ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत ‘आप’ला ४२ टक्के आणि काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली होती.
२०२२ मध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आलेले पंजाब हे पहिले पूर्ण राज्य आहे. २०१३ मध्ये दिल्लीत आप सत्तेत आले, परंतु दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही. पंजाबमधील विजयानंतर, ‘आप’च्या मोठ्या नेत्यांना व्यापक सुरक्षा मिळाली, तर पक्षाच्या विस्तार धोरणालाही चालना मिळाली. पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ३ वरून १० झाली. त्याचप्रमाणे पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’ गुजरातमध्ये पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. गुजरातमध्ये चांगल्या कामगिरीनंतरच ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. २०२७ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर पंजाबचे निकाल दिल्लीसारखे असतील तर ‘आप’साठी पुढचा मार्ग सोपा असणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.