'असंच रील्स बघत फिरणार का'; बिहारमधील भर सभेत ओवेसींनी तरुणांना झापलं, पाहा VIDEO
शहरी झगमगाट, मोबाईल स्क्रीनवरील चमकदार रील्स, आणि सोशल मीडियाच्या भुलवणाऱ्या दुनियेत हरवत चाललेल्या पिढीला AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भर सभेत तरुणांना झापलं .”रील्स पाहून ना डॉक्टर होता येतं, ना इंजिनिअर, ना वैज्ञानिक,” अशी थेट आणि भावनिक साद त्यांनी बिहारमधील तरुणांना घातली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, ओवेसींचं हे भाषण एका वेगळ्याच मुद्द्यावर लक्ष वेधणारं ठरलं. त्यांनी बिहारमधील मतदारांशी संवाद साधताना विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षण, जबाबदारी, आणि वेळेचं व्यवस्थापन यावर भर दिला.
Rahul Gandhi News:आसामचे मुख्यमंत्री तुरुंगात जाणार; राहुल गांधींच्या विधानाने सरमांचा तिळपापड
ओवेसी म्हणाले, “मी आमच्या तरुण मुलांना आणि मुलींना आवाहन करतो की, घरी जाऊन मोबाईलमध्ये रील्स पाहण्यात वेळ घालवू नका. ते तुमचं भविष्य घडवत नाहीत. पेपर वाचा, शिक्षणाकडे लक्ष द्या. तुमच्या वेळेचं सोनं करा. शिक्षणाशिवाय यश शक्य नाही.”ते पुढे म्हणाले, “दोन मिनिटांच्या रील्स पाहून ना नेता होता येतं, ना काही मोठं शिकलं जातं. उलट, त्याचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि तुमचा सर्जनशील वेळ वाया जातो.”
या भाषणात ओवैसी यांनी सध्या बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘विशेष गहन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मतदार यादीतील नावांची फेरतपासणी ही नागरी अधिकारांवर घाला असल्याचा आरोप करत म्हटलं, “निवडणूक आयोगाला नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? ही मोहिम म्हणजे NRC मागच्या दरवाजाने आणण्याचा प्रयत्न आहे.”
ते म्हणाले, “आमच्या पक्षाचे कार्यकर्ते BLO (बूथ लेव्हल ऑफिसर्स) ना जाऊन विचारतील — कुठे आहेत ते विदेशी नागरिक? 2003 मध्ये जी तपासणी झाली, त्यातून नेमकं किती विदेशी नागरिक सापडले? माहिती का दिली जात नाही?”
SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, ओवैसी यांनी तरुणांना याची जाणीव करून दिली की त्यांचं राजकीय आणि सामाजिक भान जागं असणं गरजेचं आहे. “जर तुम्ही फक्त मोबाईलमध्ये रील्स पाहण्यात गुंतून राहिलात, तर जेव्हा BLO घरी येतील तेव्हा त्यांचे प्रश्न तुम्ही कसे सोडवाल? स्वतःच्या अधिकारांसाठी जागरूक राहणं आवश्यक आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.