प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला होता. या दोघांच्या हत्येप्रकरणी त्यांची बहिण आयशा नूरी (Ayesha Noori) हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
आयशा नूरी हिने अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत उत्तर प्रदेश सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. निवृत्त न्यायाधीश किंवा स्वतंत्र एजन्सीच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यासाठी तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
यासोबतच आयेशा नूरी हिने तिचा पुतण्या आणि अतिक अहमद याच्या मुलाच्या हत्येचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. अतिकची बहीण आयशा नूरी हिने वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत आयशा नूरीने तिच्या दोन्ही भावांच्या न्यायबाह्य हत्या असे म्हटले आहे. उच्चस्तरीय सरकारी दलालांच्या माध्यमातून या हत्येचे नियोजन करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.