
चौघांच्या टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या; आधी बेदम मारहाण केली अन् नंतर...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. वाळूज एमआयडीसी परिसरात रविवारी रात्री एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. चार अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण करत चाकूने भोसकून त्याची हत्या केली.
अमोल एकनाथ बारे (वय ३०, रा. नायगाव-बकवालनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल हा शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रविवारी रात्री बंदोबस्त आटोपून खासगी चारचाकी वाहनाने घरी जात होते. यावेळी तिसगाव शिवारात रस्त्याच्या कडेला तीन ते चार तरुण एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन थांबवताच आरोपींनी तेथून पळ काढला. त्या ठिकाणी दोन दुचाकी उभ्या दिसून आल्या, तर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता.
हेदेखील वाचा : Nanded Crime: नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग, आरोपी अटकेत
दरम्यान, ही घटना पंढरपूर ते एस क्लब चौकादरम्यान अब्बास ट्रान्सपोर्टसमोर रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाला असून, खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.
रुग्णालयात नेले; मात्र मृत घोषित
पोलिसांनी तात्काळ जखमी तरुणाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. चाकूने वार झाल्याच्या खुणा मृतदेहावर आढळून आल्या असून, मृत्यू अत्यंत क्रूर पद्धतीने झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
फोटोवरून पटली ओळख
प्रारंभी मयताची ओळख पटली नव्हती. त्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मृत तरुणाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केले. हे छायाचित्र नायगाव-बकवालनगर येथील जोगेश्वरीचे सरपंच रमेश आरगडे यांनी ओळखले. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत मयताची माहिती दिल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.
चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, शोधासाठी पथक
या प्रकरणी अंमलदार सय्यद चांद सय्यद गुलाब यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.