
RBI
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहे. यात कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा समावेश आहे. या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने त्यांचा परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेने 11 जुलैपासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे, असे आरबीआयने निवेदनात नमूद केले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे 99.96 टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून मिळण्यास पात्र आहेत. तर श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या बाबतीत सुमारे 97.82 टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डीआयसीजीसीकडून मिळवण्यास पात्र आहेत. लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदार त्यांच्या ठेवींची 5 लाखांपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवण्यास पात्र असतील.
व्यवसाय करण्यास बंदी
या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे या बँकांना ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे; ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहा बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत, असेही आरबीआयने नमूद केले आहे.
8 मार्च 2023 पर्यंत डीआयजीसीने बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 57.24 कोटी रुपये आधीच दिली आहे. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांनादेखील सदर बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्याची विनंती करण्यात आली आहे.