सौजन्य- सोशल मिडीया
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी भारताच्या राष्ट्रपाती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेचे सदस्य भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. घटनेच्या कलम 95(1) अंतर्गत प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून महताब यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
सभागृहाच्या नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत महताब या पदावर राहतील काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी हंगामी अध्यक्षाची निवड केली जाते. कनिष्ठ सभागृह लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत पीठासीन अधिकारी म्हणून भर्तृहरी महताब हे कर्तव्य बजावतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की लोकसभा सदस्य के सुरेश, टीआर बालू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय प्रोटेम स्पीकरला मदत करतील.
ओडिशाच्या कटक लोकसभा मतदारसंघातून भर्तृहरी महताब सातव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. भर्तृहरी हे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत हरेकृष्ण महाताब यांचे पुत्र आहेत. भर्तृहरी महताब यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिजू जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी कटक मतदारसंघातून बीजेडीचे संतरूप मिश्रा यांचा ५७,०७७ मतांनी पराभव केला.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. नवनिर्वाचित सदस्य 24-25 जून रोजी शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे.
हंगामी अध्यक्षांना लोकसभेचे पीठासीन अधिकारी देखील म्हटले जाऊ शकते. हंगामी अध्यक्षांना दैनंदिन कामकाज चालवावे लागते. नव्या अध्यक्षांच्या निवडीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या हंगामी अध्यक्षांना पार पाडाव्या लागतात. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते नवीन सदस्यांना शपथ देतील. पण हंगामी अध्यक्षांची नियुक्ती ही तात्पुरती असते. सभागृहाचे नवे अध्यक्ष निवडून येईपर्यंत ते काम करतात. स्पीकर हा बहुमताने निवडला जातो.