राष्ट्रपतींवर केलेलं ते वक्तव्य सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार; नेमकं काय आहे प्रकरण?
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू झालं. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. अभिभाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भाषणानंतर खूप थकलेल्या वाटल्या असं विधान केलं होतं.मात्र आता हे वक्तव्य सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींवर केलेल्या या याच वक्तव्यावरून सोनिया गांधींविरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल पुअर लेडी (Poor Lady) असा शब्द वापरल्याप्रकरणी मुझफ्फरपूर येथील न्यायालयात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वकील सुधीर ओझा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना देण्याची मागणीही केली आहे. तसचं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनाही सह-आरोपी करण्याची मागणी ओझा यांनी तक्रारीत केली आहे.
सोनिया गांधी यांनी ‘Poor Lady’ असं म्हणत राष्ट्रपती मुर्मू यांचा अपमान केल्याचा दावा करत ओझा यांनी सोनिया गांधींच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “हा देशाच्या सर्वोच्च संविधानक अधिकाराचा अपमान असून या प्रकरणी राहुल आणि प्रियंका गांधींना देखील सह-आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.”, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना ‘पुअर लेडी’ असं संबोधलं. भाषणावेळी त्या खूपच थकलेल्या दिसल्या. बोलताना त्या अडखळत होत्या, असं सोनिया गांधी म्हणाल्य़ा. त्यानंतर भाजपकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या द्वारकामध्ये निवडणूक प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे सोनिया गांधी यांचे वक्तव्य अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले. त्या ओडिशाच्या जंगलातील आदिवासी कुटुंबातून इथपर्यंत पोहोचल्या आहेत. हिंदी ही त्यांची मातृभाषा नाही. त्या उडिया भाषा बोलतात. मातृभाषा नसूनही त्यांनी हिंदीत खूप चांगल्या पद्धतीने भाषण केलं आणि सगळ्यांना प्रेरित केले. मात्र, गांधी या राष्ट्रपतींना गरीब आणि थकलेल्या म्हणाल्या.
त्यांना आदिवासी मुलीचं बोलणं कंटाळवाणं वाटतं. हा देशातील १० कोटी आदिवासी बंधू-भगिनींचा अवमान आहे. काँग्रेसच्या या शाही कुटुंबाला तळागाळातून आलेले लोक आवडत नाहीत. गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोक पुढे जात आहेत, पण त्यांना पावलोपावली अपमानित केलं जातं. या लोकांना शिवीगाळ करणं, देशाची बदनामी करणं, अर्बन नक्षलवादाच्या गोष्टी करणं यांना अधिक चांगलं वाटतं. या लोकांपासून खूप सावध राहायला हवं, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.