बिहारच्या राजकारणात अखेर चिराग पासवान यांची अधिकृत एन्ट्री; सर्व २४३ जागा लढण्याची केली घोषणा
बिहारमध्ये येत्या वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशा वेळी केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांनी मोठी घोषणा करत संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे. छपरा येथील राजेंद्र स्टेडियममध्ये रविवारी पार पडलेल्या नव-संकल्प महासभेत त्यांनी अधिकृतपणे बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व २४३ जागा लढवण्याची घोषणा केली आहे.
चिराग पासवान यांनी आपल्या भाषणात ‘प्रत्येक जागा चिराग पासवान लढणार’ असं म्हणत आगामी निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा पण केला आहे. त्यांनी ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हे आपलं पहिलं ध्येय असल्याचं सांगत त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे.
या सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भावनिक आवाहन करत ते म्हणाले की, “आरक्षण रद्द होईल अशी अफवा पसरवली जात आहे, पण जोपर्यंत रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान जिवंत आहे, तोपर्यंत कोणतीही ताकद आरक्षण संपवू शकत नाही.” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
“नव-संकल्प महासभा” — छपरा से नवबिहार की ओर
आज छपरा के ऐतिहासिक राजेंद्र स्टेडियम में लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) द्वारा आयोजित “नव-संकल्प महासभा” में विशाल जनसैलाब को संबोधित किया।
यह नवबिहार की परिकल्पना को साकार करने की दिशा में उठाया गया एक ऐतिहासिक कदम है।
नवबिहार का… pic.twitter.com/gFmllEYNkQ
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) July 6, 2025
बिहारमधील बेरोजगारी आणि स्थलांतर यावर भाष्य करत चिराग म्हणाले की, “बिहारचा तरुण रोजगाराच्या शोधात परराज्यात जातो, हे दुर्दैवी आहे. आम्ही अशी सरकार आणू इच्छितो, जी लोकांना त्यांच्या गावी, प्रखंडातच रोजगार उपलब्ध करून देईल.” त्यांनी 2023 मधील राज्य सरकारवरही टीका करत विचारले की, “तेव्हा उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री RJD कडून होते, मग डोमिसाइल (स्थायिकता) धोरण का आणले गेले नाही?”
आपल्याला बिहारमध्ये सक्रिय होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव न घेता निशाणा साधत, चिराग म्हणाले की, “माझ्या बिहारमध्ये येण्यावर अडथळे आणले जात आहेत. काही लोकांना वाटते की मी फक्त दिल्लीपुरता सीमित राहावं, पण मी आता बिहारच्या भूमीवर सक्रीय राजकारण करणारच.”
तसेच राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीप्रकरणी त्यांनी नीतीश कुमार यांच्या सरकारवर कडाडून टीका केली. “दररोज हत्या आणि गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. सुशासनाच्या नावाखाली चाललेल्या या सरकारमध्ये जर अशा घटनांना आळा घातला जात नसेल, तर आम्ही याचा जोरदार विरोध करू,” असे ठामपणे सांगत त्यांनी बिहारमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
Bihar Politics: सॅनिटरी पॅडवरील राहुल गांधींच्या फोटो, भाजप आक्रमक; नेमकं काय आहे हा प्रकार?
चिराग पासवान यांच्या या घोषणा आणि भाषणामुळे बिहारच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली असून, लवकरच आगामी निवडणुकीसाठी राजकीय आघाड्या आणि युतीसंबंधी महत्त्वाचे निर्णय होताना पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.