
टोलमधून वाहनचालकांना लवकरच मिळणार मोठी सूट; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण संकेत
नवी दिल्ली : महामार्गावरून आपली वाहने नेताना वाहनधारकांना टोल द्यावा लागतो. या टोलदरात काही कालावधीनंतर चढउतार दिसून येतो. त्यात आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देशभरातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला जाणार आहे. सरकार एक नवीन टोल प्रणाली आणणार आहे, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार कमी होईल, असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.
नवीन टोल प्रणालीमुळे टोल कराचा भार कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. या नवीन टोल प्रणाली लागू झाल्यानंतर वाहनचालकांना टोल करात सवलत मिळू शकते. एका कार्यक्रमात गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार कमी होईल, जो बऱ्याच काळापासून एक मोठी चिंतेचा विषय बनत होता. यापूर्वीही त्यांनी गेल्या महिन्यात संसदेत या टोल धोरणाचा उल्लेख केला होता. सरकारला ही प्रणाली अधिक युजर-फ्रेंडली बनवायची आहे असे सांगण्यात आले. देशातील रस्ते पायाभूत सुविधा मजबूत राहतील, याचीही त्यांना खात्री करायची आहे.
केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, ‘आम्ही एक नवीन धोरण आणत आहोत, ज्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल. आम्ही टोल वसुलीची प्रक्रिया बदलत आहोत. मी लगेचच यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. मात्र, मला विश्वास आहे की, पुढील 8-10 दिवसांत ते जाहीर केले जाईल’.
टोल महसूल वाढला
अलिकडच्या वर्षांत भारतातील टोल वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये महसूल ६४,८०९.८६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ३५ टक्के वाढल्याचे दिसत आहे. २०१९-२० मध्ये झालेल्या २७,५०३ कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत ही वाढ विशेषतः लक्षणीय आहे.