मनाली: महाराष्ट्र आणि देशातील अनेक राज्य मान्सूनने व्यापली आहेत. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशमधून एक बातमी समोर येत आहे. कुल्लू-मनाली ही हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. कुल्लू यथे ढगफुटी झाली आहे. ढगफुटी झाल्यानंतरचा तेथील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओ पाहून किती जोरदार पाऊस झाला असेल याचा अंदाज येत आहे.
हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.
कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीचे भयानक स्वरूप यामध्ये दिसून येत आहे. हवामान विभगाने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा
गुजरात राज्यात देखील प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील 26 जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर तीन जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पानी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राजस्थानमध्ये देखील पावसाचा कहर
मान्सूनने देशातील अनेक राज्ये व्यापली आहेत. राजस्थानमध्ये देखील जोरदार पावसाने कहर केला आहे. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. तसंच, या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.