बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी अपडेट; आता थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात तक्रार
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) विजयानंतर ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सभारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या सभारंभाला गाटबोट लागलं. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीवर नियंत्रण न मिळवता आल्यामुले चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला तर ५६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे करण्यात आली असून, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
१. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर थेट तक्रार
बेंगळुरूच्या गिरीश कुमार यांनी तक्रार केली असून, मुख्यमंत्री यांनी स्वतः लोकांना समारंभासाठी आमंत्रित करूनही योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. IPL हा खाजगी व्यापारी स्पर्धा असूनही सरकारने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम का आयोजित केला, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
२. पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई
बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद आणि इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नव्याने आयपीएस सीमंत कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
३. मुख्यमंत्री कार्यालयातील बदल
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात आली आहे. तसेच चना विभाग प्रमुख हेमंत निंबालकर यांची बदली झाली आहे.
४. RCB आणि इव्हेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना अटक
RCB चा मार्केटिंग हेड निखिल सोसले याला अटक करण्यात आली आहे. तसेच, इव्हेंट कंपनी DNA एंटरटेनमेंटचे तिघे — किरण, सुमंथ आणि सुनील मॅथ्यू — यांनाही अटक झाली असून सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
५. विराट कोहलीविरुद्ध तक्रार
समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध देखील कब्बन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
६. नुकसान भरपाईत वाढ
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी नुकसानभरपाई ₹१० लाखांवरून वाढवून ₹२५ लाख केली आहे. RCB संघानेही स्वतंत्र मदतीची घोषणा केली आहे.
७. KSCA पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष ई.एस. जयराम यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध देखील FIR दाखल झाली आहे, परंतु कर्नाटक हायकोर्टाने त्यांना १६ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
८. CID चौकशीचे आदेश
राज्य सरकारने या प्रकरणाची CID चौकशी जाहीर केली आहे. CID अधिकाऱ्यांनी KSCA कार्यालयात भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
९. न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना
न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
१०. कोणा कोणावर FIR?
RCB, DNA एंटरटेनमेंट प्रा. लि., आणि KSCA यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे कर्नाटक सरकारवर मोठा राजकीय आणि प्रशासनिक दबाव निर्माण झाला असून, विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील तपास आणि चौकशी अहवालाकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.