Congress Bhupesh Baghel targets Modi government over Donald Trump ino pak war ceasefire announcement
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सेनेने हे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने एका रात्रीमध्ये 400 हून अधिक ड्रोन हल्ले केले असल्याची माहिती भारतीय सेनेकडून देण्यात आली. यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरसह भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केल्यामुळे युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे कॉंग्रेसने संशय व्यक्त केला आहे.
भारत पाकिस्तान युद्धामध्ये पडणार नाही आणि बोलणार नाही. या प्रश्न त्या दोन देशांमधील असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. मात्र भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन युद्धबंदीची घोषणा केली. यामुळे देशातील विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संशय घेत अमेरिकेच्या दबावाखाली सरकारने आपले धोरण बदलले का? असा सवाल विचारला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, “काँग्रेस सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा काँग्रेसने राजकारणापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले. 1971 मध्ये अमेरिकेच्या दबावाला न जुमानता इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन भाग केले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्याला राजकारणाची नाही तर राष्ट्रवादाची गरज आहे. शत्रूसमोर कमकुवतपणा नव्हे तर ताकद दाखवा. सरकारने स्पष्ट करावे की आपण अमेरिकेच्या दबावाखाली आपले धोरण बदलले का? काँग्रेसने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. संकटाच्या वेळी, जेव्हा संपूर्ण देश एकजूट होता, तेव्हा भाजप नेते सोशल मीडियावर राजकीय विधाने करत होते.” अशी टीका भूपेश बघेल यांनी केली आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभी आहे पण आम्ही पारदर्शकतेची मागणी करतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली युद्धबंदीची घोषणा ही राजनैतिक अपयश नाही का? आपण तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारली का? शिमला करार रद्द झाला का? आपण दहशतवादाविरुद्ध लढत होतो आणि काश्मीर मुद्दा मध्येच आला! युद्धबंदीच्या अटी काय आहेत हे सांगण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे? शंका दूर करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे.” अशी मागणी कॉंग्रेस नेते भूपेश बघेल यांनी केली आहे.
‘पहलगामच्या दहशतवाद्यांचे काय झाले?’
ते पुढे म्हणाले की , “बदला घेतला गेला आहे हे भाजप प्रवक्त्याचे विधान अनेक प्रश्न उपस्थित करते. पहलगामच्या चार दहशतवाद्यांचे काय झाले? ते पकडले गेले की मारले गेले? सुरक्षेतील त्रुटींना कोण जबाबदार आहे? गृहमंत्री राजीनामा देत आहेत का?” असे अनेक सवाल कॉंग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उपस्थित केले आहेत.