Delhi BMW Accident: दिल्लीतील धौला कुआं परिसरात रविवारी एका बीएमडब्ल्यू कारने वित्त मंत्रालयात कार्यरत उपसंचालक नवजोत सिंग यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही कार एक महिला चालवत होती. या अपघातात नवजोत सिंग यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नीही जखमी झाली. या प्रकरणी आता आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, नवजोत सिंग यांना रुग्णालयात नेणाऱ्या व्हॅन चालकाने केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या गुलफाम नावाच्या व्यक्तीने आपल्या व्हॅनमध्ये नवजोत सिंग आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. आता गुलफामने पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. तो म्हणाला की, ‘अपघातानंतर आरोपी महिला स्वतःच माझ्या गाडीत येऊन बसली आणि तिनेच मला रुग्णालयाचा पत्ता सांगितला. मला आजूबाजूच्या रुग्णालयांबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे मी तिच्या सांगण्यानुसार गाडी चालवत राहिलो.’
#WATCH | Dhaula Kuan (Delhi) BMW accident | Gulfam, an eyewitness who took the victims to Nulife Hospital, says, “I was coming from Dhaula Kuan when I saw a car in an accidental condition and some people were injured. I made two people sit in my car and took them to the hospital.… pic.twitter.com/WUe8MCz6bS
— ANI (@ANI) September 15, 2025
गुलफामने पुढे सांगितले की, ‘आम्हाला रुग्णालयात पोहोचायला २० मिनिटे लागली. मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा डॉक्टर आधीच तयार होते, त्यामुळेच त्यांनी मला त्या रुग्णालयात जाण्यास सांगितले असावे.’
नवजोत सिंग यांच्या पत्नी संदीप कौर यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. संदीप कौर यांनी सांगितले की, जखमी अवस्थेत असताना आरोपी त्यांना आणि त्यांच्या पतीला व्हॅनसारख्या गाडीतून घेऊन जात होते. त्यांनी वारंवार विनंती केली की त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे.
मात्र, आरोपींनी त्यांचे ऐकले नाही आणि जवळच्या मोठ्या रुग्णालयाऐवजी २० किलोमीटर दूर असलेल्या जीटीबी नगर येथील एका छोट्या रुग्णालयात त्यांना नेले. संदीप कौर यांचा आरोप आहे की, जर त्यांना तातडीने जवळच्या मोठ्या रुग्णालयात दाखल केले असते, तर त्यांच्या पतीचा जीव वाचू शकला असता. या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.