नवी दिल्ली : माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) हे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या जवळपास एका वर्षापासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जेव्हा ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती, तेव्हा रघुराम राजन हे स्वतः त्या यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर रघुराम राजन हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान, या सर्व गोष्टीवर आता मुलाखतीत बोलताना रघुराम राजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘मी राजकारणात यावं, असं माझ्या कुटुंबीयांना वाटत नाही. मात्र, राजकारणात येण्यापेक्षा मला शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करायला आवडेल. मी याआधीही वारंवार सांगितले. पण लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी राजकारणात येऊ इच्छित नाही. मी सरकारमध्ये आहे किंवा नाही, याची पर्वा मी करत नाही. मात्र, सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये मी बोलतो आणि हाच माझा प्रयत्न राहणार आहे, असे रघुराम राजन यांनी म्हटले.
राहुल गांधीबाबत काय म्हणाले?
राहुल गांधी यांना अनेकदा नेतृत्व करण्याची क्षमता नसलेले व्यक्ती म्हणून संबोधित करण्यात आले. मात्र, मला वाटते की ते प्रचंड हुशार आणि धाडसी आहेत. पण राहुल गांधी यांच्याबाबत जे चित्र निर्माण करण्यात आले ते चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजींची आणि वडीलांची हत्या होताना पाहिली. राहुल गांधी यांच्याकडे दृढ विश्वास आणि ते मांडत असलेले मुद्दे चांगले आहेत, असे रघुराम राजन म्हणाले.