इन्कम टॅक्स रिटर्न : केंद्र सरकारने आता कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. आयकर रिटर्न भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवून ३० नोव्हेंबर केली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख देखील एक महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, फॉर्म ITR-7 मध्ये आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या १८.२३ लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या ४७.४५% निव्वळ कर संकलन झाले आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये होते. आयकर विभागाने रिटर्न सबमिट करताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक ई-फायलिंग डेस्कही स्थापन केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी एकूण प्रत्यक्ष कर संकलन १८.२९ टक्क्यांनी वाढून ९.८७ लाख कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ८.३४ लाख कोटी रुपये होते.