Independence Day 2025 33 UP village heads invited to Red Fort flag hoisting
Independence Day 2025 : भारताचा स्वातंत्र्यदिन हा केवळ राष्ट्रीय उत्सव नसून, तो एकात्मतेचा, अभिमानाचा आणि जनतेच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. धर्म, जात, प्रांत कोणताही असो तिरंगा फडकताना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची लाट उसळते. यावर्षी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण, तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव हे सारे क्षण लाखो लोकांच्या मनात कायम कोरले जातील.
मात्र, यावेळी एक विशेष बाब देशभरात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील फक्त ३३ ग्रामप्रमुखांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हे केवळ सन्मानाचे आमंत्रण नाही, तर ग्रामीण भारताच्या प्रगतीचा आणि पंचायत शक्तीच्या सामर्थ्याचा अभिमानास्पद गौरव आहे.
योगी आदित्यनाथ सरकारच्या विविध योजनांमध्ये आणि धोरणांमध्ये या ग्रामप्रमुखांनी आपल्या क्षेत्रात अनुकरणीय कार्य केले आहे. ग्रामीण विकास, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, डिजिटल पंचायत सचिवालयाची उभारणी, तसेच लोकसहभाग वाढविणे या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम नेतृत्व दाखवले आहे.
या ग्रामप्रमुखांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांनी स्वच्छ, सुजलाम-सुफलाम आणि तंत्रज्ञानाशी जोडलेले आधुनिक गावांचे स्वरूप प्राप्त केले आहे. काहींनी आपल्या गावात शंभर टक्के शौचालय बांधणी पूर्ण केली, काहींनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मोहिमा राबवल्या, तर काहींनी गावात डिजिटल सुविधा पोचवल्या.
हे देखील वाचा : Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
या ३३ ग्रामप्रमुखांपैकी अनेकांना त्यांच्या कामगिरीसाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे ते केवळ आपल्या गावांचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. लाल किल्ल्यावर त्यांची उपस्थिती म्हणजे ग्रामीण भारताच्या यशोगाथेला मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे.
पंचायत ही भारतीय लोकशाहीची पायाभूत संस्था आहे. या ग्रामप्रमुखांनी दाखवून दिले की, योग्य नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर गावांचा चेहरामोहरा बदलता येतो. लाल किल्ल्यावर त्यांची उपस्थिती देशातील इतर पंचायतींनाही प्रेरणा देईल, की बदल शक्य आहे — फक्त इच्छाशक्ती हवी.
हे देखील वाचा : RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर
उत्तर प्रदेशसाठी हा क्षण गौरवाचा आहे. आपल्या गावातील नेत्यांना राष्ट्रीय मंचावर सन्मान मिळताना पाहणे, ही प्रत्येक गावकऱ्याची अभिमानाची बाब आहे. हे ३३ ग्रामप्रमुख केवळ आपल्या क्षेत्रातील नेतृत्वाचे प्रतीक नाहीत, तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील मजबूत पंचायत शक्तीचे दूत आहेत. स्वातंत्र्यदिन हा स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची आठवण करून देतो, पण त्याचबरोबर तो आपल्याला हेही शिकवतो की आजची देशसेवा ही विकास, प्रगती आणि जनतेच्या कल्याणातून होते. आणि या ३३ ग्रामप्रमुखांनी ती देशसेवा प्रत्यक्ष कृतीतून साकारली आहे.