Uttrakhand Cloudburst: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोर्यात वसलेलं आणि गंगोत्री धामला जाणाऱ्या मार्गावर वसलेलं धराली गाव मंगळवारी दुपारी अवघ्या ३० सेकंदांत भयंकर जलप्रलयाचा साक्षीदार बनलं. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावात मोठं नुकसान झालं आहे. अनेक होमस्टे, हॉटेल्स, घरे मलब्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान येथील धराली गावात भारतीय लष्कराचे ऑपरेशन धराली सुरु आहे. याअंतर्गत मलब्याखाली गाडल्या गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
उत्तरकाशी येथील धराली येथे झालेल्या दुर्घटनेत अनेक जण मलब्याखाली गाडले गेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या मलब्यातून आतापर्यंत ३५७ नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान ११९ नागरिकांना एअरलिफ्ट केले गेले आहे. यामध्ये १३ सैनिकांना देखील रेस्क्यू केले गेले आहे.
मात्र अजूनही या घटनेत ८ सैनिक आणि १०० पेक्षा जास्त नागरिक बेपता असल्याचे समोर येत आहे. बचावकार्य अत्यंत वेगाने केले जात आहे. भारतीय वायुसेना, लष्कराची तब्बल ६८ हेलिकॉप्टरच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य केले जात आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचे रेस्क्यू आणि त्यांना आवशयक असणारी सामग्री देखील पुरवली जात आहे. भारतीय लष्कराचे सैनिक, इंजिनियर, मेडिकल टीम व डॉग स्क्वाड आणि स्थानिक प्रशासन असे एकत्रितपणे हे ऑपरेशन धराली राबवले जात आहे.
दरम्यान या दुर्घटनेत गावातील मुख्य बाजारपेठ, घरं, मंदिर, आणि पर्यटक विश्रामस्थळं सगळं काही मातीखाली गाडलं गेलं आहे. मुखबा गावाकडे जाणारा पारंपरिक पादचारी मार्गही खचला आहे. सध्या NDRF आणि SDRF च्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे, मात्र दुर्गम भागामुळे अडथळे येत आहेत.
उत्तरकाशीतील दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात 151 पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 120 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत.
उर्वरित 31 पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून पर्यटकांना शोधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. ढगाळ वातावरणामुळे मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नाही, संपर्क झाल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची ग्वाही श्री. बर्धन यांनी दिली.