२०१४-१५ मध्ये १३५ रेल्वे अपघात, यावर्षी आतापर्यंत..., संसदेत केंद्र सरकाराने दिली अपघाताची माहिती (फोटो सौजन्य-X)
Indian Railway Accident News in Marathi : भारतीय रेल्वे सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि वेळोवेळी घेतलेल्या सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. शुक्रवारी राज्यसभेत ही माहिती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०१४-१५ मध्ये १३५ अपघात झाले होते, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या ३१ वर आली आणि २०२५-२६ मध्ये जून २०२५ पर्यंत फक्त तीन अपघातांची नोंद झाली आहे.
वैष्णव यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २००४ ते २०१४ या काळात एकूण १,७११ रेल्वे अपघात झाले, म्हणजेच वार्षिक सरासरी १७१ अपघात झाले, जे आता विक्रमी नीचांकी पातळीवर आले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने अनेक पावले उचलली आहेत. याअंतर्गत, ६,६३५ स्थानकांवर इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे पॉइंट्स आणि सिग्नलच्या केंद्रीकृत ऑपरेशनद्वारे मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी झाले आहेत.
तसेच ११,०९६ लेव्हल क्रॉसिंग गेटवर इंटरलॉकिंग सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे रेल्वे गेटवर सुरक्षा वाढली आहे. यासोबतच, ६,६४० स्थानकांवर ट्रॅक सर्किटिंग करण्यात आले आहे जेणेकरून ट्रॅकवर ट्रेनची उपस्थिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निश्चित करता येईल. जुलै २०२० मध्ये राष्ट्रीय स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली म्हणून स्वीकारण्यात आलेली ‘कवच’ तंत्रज्ञान टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. आतापर्यंत अनेक मार्गांवर ती लागू करण्यात आली आहे आणि दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गांवर काम सुरू आहे.
लोको पायलटची सतर्कता सुनिश्चित करण्यासाठी सर्व इंजिनमध्ये ‘दक्षता नियंत्रण उपकरणे’ बसवण्यात आली आहेत. धुक्याच्या हंगामात कमी दृश्यमानतेदरम्यान क्रूला सतर्क करण्यासाठी ओएचई मास्टवर रेट्रो-रिफ्लेक्टीव्ह सिग्मा बोर्ड बसवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, सुरक्षेसाठी, धुक्यामुळे प्रभावित भागात लोको पायलटना जीपीएस आधारित ‘फॉग सेफ्टी उपकरणे’ देण्यात आली आहेत जेणेकरून ते सिग्नल आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्ससारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर जाणून घेऊ शकतील, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
तर उपनगरीय लोकलच्या अपघातात मागील १० वर्षात तब्बल २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने अपघातांमधील फक्त १ हजार ४०८ मृतांच्या नातेवाईकांना १०३ कोटी रुपये, तर जखमींना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत (नुकसान भरपाई) दिले आहेत.