नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले...
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि.9) उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मताधिक्क्याने विजय मिळवला. या विजयानंतर देशभरातून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. असे असताना माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना शुभेच्छा दिल्या.
उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक मंगळवारी पार पडली. यामध्ये एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली आहेत. सी. पी. राधाकृष्णन हे या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘सी. पी. राधाकृष्णन व्यापक अनुभवामुळे उपराष्ट्रपतिपदाला अधिक गौरव मिळेल. हे प्रतिष्ठित पद स्वीकारल्याने आपल्या देशाच्या प्रतिनिधींचा विश्वास आणि आत्मविश्वास दिसून येतो’.
दरम्यान, जगदीप धनखड यांनी जुलैमध्ये उपराष्ट्रपतिपद सोडल्यानंतर हे त्यांचे पहिलेच जाहीर विधान होते. राधाकृष्णन यांचे या उच्च पदावर निवड होणे हे लोकप्रतिनिधींचा विश्वास दर्शवते. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अनुभवामुळे उपराष्ट्रपतिपदाला अधिक आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली उपराष्ट्रपतिपद नवीन उंची गाठेल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल. त्यांनी त्यांना यशस्वी कार्यकाळ आणि देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसकडून करण्यात आली होती टीका
जगदीप धनखड यांनी जुलै महिन्यात उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. धनखड यांनी अचानक अशाप्रकारे राजीनामा दिल्याने विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. राजीनामा दिल्यापासून धनखड यांनी एकदाही उघडपणे भाष्य केले नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष लागले होते. त्यातच काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. ‘देश त्यांच्या बोलण्याची वाट पाहत आहे’, असे म्हणत धनखड यांच्या मौनावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अखेर धनखड यांनी भाष्य करत नव्या उपराष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या.