...तर ३ वर्षांची शिक्षा होणार; बेंगळुरू चेंगराचेंगरीनंतर कर्नाटक सरकार आणतंय विधेयक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटक सरकारने एक मोठे पाऊल उचललं आहे. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘कर्नाटक गर्दी नियंत्रण विधेयक, २०२५’ चा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी सादर करण्यात आला. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.
मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणे आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या चेंगराचेंगरीसारख्या घटना रोखणे, नवीन कायद्यामागचा उद्देश आहे. प्रस्तावित विधेयकांतर्गत, निर्धारित मानकांचे उल्लंघन केल्यास किंवा परवानगीशिवाय ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद असेल. तसेच, ५,००० रुपयांपर्यंत दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.
मात्र , कायदा धार्मिक आणि पारंपारिक कार्यक्रमांना लागू होणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. यातून मेळावे, रथयात्रा, पालखी उत्सव, बोट महोत्सव (तेप्पोत्सव), उर्स यासारखे धार्मिक कार्यक्रमांना वगळण्यात आलं आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या इतिहासात आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनला. ३ जून रोजी त्यांनी पंजाब किंग्जला (पीबीकेएस) ६ धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर अवघ्या एका दिवसात ४ जून रोजी बेंगळुरूमध्ये विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. विजयी रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात, नंतर आरसीबी व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट स्टेट असोसिएशन (केएससीए), भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हात झटकले. नंतर ५ जून रोजी उच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि १० जूनपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला होता.