लखनौ : भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) पुन्हा एकदा वात सापडलेले आहेत. ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाडूंनी (Olympic Players) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आघाडी उघडलेली आहे. तर दुसरीकडे बृजभूषण सिंह यांना पाठिशी घालण्याच्या प्रयत्न भाजप आणि केंद्र सरकारकडून होत असल्याचा आरोपही करण्यात येतोय.
बृजभूषण सिंह हे यापूर्वीही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधामुळं चर्चेत आले होते. महाराष्ट्राला परिचित झालेले होते. बृजभूषण सिंह अयोध्या परिसरात बाहुबली नेते म्हणून परिचित आहेत. अनेक शिक्षण संस्था त्यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये 80 हजार विद्यार्थी आणि 3,500 शिक्षक आहेत. बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे.
बृजभूषण सिंह यांचं साम्राज्य आहे तरी किती?
उत्तर प्रदेशात 54 शिक्षण संस्था अशा आहेत ती ज्या संस्थांशी बृजभूषम सिंह हे संबंधित आहेत. यातल्या अनेक शैक्षणिक संस्थांचे ते मालक आहेत. अयोध्या ते गौंडा या महामार्गावर त्यांच्या या संस्था आहेत. गोंडा, बलरामपूर, बहराइच आणि श्रावती या 4 जिल्ह्यांत त्यांचं हे साम्राज्य पसरलेलं आहे.
तरुण आणि शेतकऱ्यांत दबदबा
गोंडा जिल्ह्यातलं नवाबजंग हे बृजभूषण सिंह यांच्या या साम्राज्याचं मुख्यालय मानण्यात येतं. या परिसरात शैक्षणिक संस्था, तरुण आणि शेतकऱ्यांत योजना आखून बृजभूषण यांनी त्यांचा दबदबा निर्माण केलेला आहे. बृजभूषण सिंह यांच्या या कार्यामुळं मोठ्या संख्येनं त्यांना पाठिंबा देणारा वर्ग या परिसरात त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळं या परिसरातील कमी नागरिक हे बृजभूषण आणि त्य़ांच्या वादाविषयी चर्चा करताना दिसतात.
कसं चालतं बृजभूषण यांचं साम्राज्य?
नवाबजंगमध्ये महाविद्यालयांसह बृजभूषण यांचं एक हॉटेल एक शूटिंग रेंज आणि एक कुस्ती अकादमीही आहे. बेरोजगारी असलेल्या या मतदारसंघात तरुणांसाठी दरवर्षी बृजभूषण हे टॅलेंट हट्स किसान सन्मान, क्रीडा महोत्सव यांचं आयोजन करतात. बक्षीस ही रोख रक्कमेच्या रुपात असतात. यातील टॅलेंट हंट सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ही स्पर्धा गोंडाच्या महाविद्यालय आणि शाळांत करण्यात येते. स्पर्धेसाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिका सर्व संस्थांना पाठवण्यात येतात. विजय मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मोटारसायकल किंवा स्कूटी देण्यात येते. तर त्यानंतरच्या क्रमाकांना 22 हजारांपासून रक्कम दिली जाते.
कसं निर्माण झालं साम्राज्य?
गेल्या दोन दशकांत बृजभूषण सिंह यांचं हे साम्राज्य निर्माण झाल्याचं भाजपाचे नेते सांगतात. 1990 साली नवाबगंजमध्ये पहिलं कॉलेज सुरु करण्यात आलं. अधिकृतरित्या ते 1995 साली सुरु झालं. त्यानंतर बृजभूषण यांनी दुसऱ्या व्यवसायात जम बसवला. आता त्यांच्याकडे शाळा, कॉलेजेस आणि हॉस्पिटल्सची चेन असल्याचं मानण्यात येतंय.
तरुणांमध्ये बृजभूषण सिंह हे लोकप्रिय असल्याचं सांगण्यात येतं. अयोध्येत साकेत कॉलेजात ते विद्यार्थी संघाचे नेते होते. 1980 आणि 90 च्या दशकांत राम मंदिर आंदोलनाच्या निकटवर्तीयांत त्यांचा समावेश होता.
1991 साली बृजभूषण सिंह हे पहिल्यांदा खासदार झाले होते. नंतर 1996 साली दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना लपण्यासाठी जागा दिली. या आरोपाखाली त्यांच्यावर टाडा लावण्यात आला आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. भाजपानं त्यांना त्यावेळी तिकिट दिलं नाही, त्यांची पत्नी केकतीदेवी सिंग यांना गौंडातून निवडणुकीत उतरवण्यात आलं. तिथून त्या निवडणूक जिंकून आल्या.