लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली खंडणी
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने काही दिवसाआधी अपक्ष खासदार पप्पू यादव यांना धमकी देण्यात आली होती, मात्र नंतर प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा बिहारमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली गेल्याचे समोर आले आहे आणि विशेष म्हणजे यावेळी धमकी आमदार किंवा खासदाराला नव्हे तर थेट मंत्र्याला देण्यात आली आहे.
बिहार सरकारमधील कामगार मंत्री संतोष सिंह यांना धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर खंडणीच्या रक्कमेसाठी क्यूआर कोडही पाठवला गेला, ज्यावर पैसे पाठवण्यास सांगितले गेले. बिहार(Bihar) सरकारमधील कामगार मंत्री संतोष कुमार सिंह यांना कुणीतरी फोन करून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली. आतापर्यंत हा धमकीचा फोन नेमका कुणी केला होता, याचा शोध लागलेला नाही. मात्र मंत्री संतोष कुमार सिंह यांनी याबाबत बिहारचे डीजीपी विनय कुमार यांना माहिती दिली आहे. त्यानंतर आता पोलिस या प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत.
मंत्री संतोष कुमार यांना ज्या नंबरवरून फोन येत होता, भारताबाहेरचा नंबर असल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना धमकी दिली की, जास्त शहाणे बनताय, ३० लाख रुपये द्या नाहीतर चांगलं होणार नाही. यावर मंत्री संतोष कुमारही चिडले आणि म्हटले की जे करायचं ते कर, मी कुणालाही घाबरत नाही. एवढं बोलून फोन कट केला.
मात्र फोन करणाऱ्याने त्यांना पुन्हा त्रास देणं सुरूच ठेवलं. एकामागोमाग अनेक फोन येत होते आणि मेसेज येत होते. अखेर प्रकरणाचं गांभीर्य पाहून मंत्री संतोष कुमार यांनी याबाबत डीजीपी यांना माहिती दिली.
याआधी बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव(Papu Yadav) यांनाही धमकी मिळाली होती. पूर्णिया मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू याद यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. यामुळे पप्पू यादव सरकारवर चिडले होते आणि त्यांनी आपल्यासाठी सुरक्षेचीही मागणी केली होती. मात्र याबाबत पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा भलतचं समोर आलं. कारण, हे प्रकरण प्रत्यक्षात लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित नव्हतंच, तर खासदारा सुरक्षा व्यवस्था मिळावी यासाठी हे सगळं केलं गेल्याचं समोर आलं आहे.