तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न (फोटो सौजन्य-X)
Lawrence Bishnoi News in Marathi: पंजाबचे माजी डीएसपी गुरशेर सिंग संधू यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली आणि त्यासाठी पत्रकार पंजाब तुरुंगात कसा पोहोचला असा सवाल उपस्थित केला. सीआरपीसीच्या कलम ४१अ अंतर्गत जारी केलेल्या नोटीसविरुद्ध संधू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावत म्हटले की त्यांची अशीच याचिका पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, ज्याची सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे. याचिकेत संधू यांनी नोटीस रद्द करण्याची आणि पुढील कठोर कारवाई न करण्याची मागणी केली होती.
४ जून रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन तुरुंगात लॉरेन्स बिश्नोई यांच्या मुलाखतीसंदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये संधू यांना आरोपी बनवण्याच्या समर्थनार्थ सीलबंद लिफाफ्यात पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने असेही म्हटले होते की, जनरल डायरीच्या नोंदीमध्ये संधूला आरोपी बनवण्याचे कारणांचा उल्लेख नाही. त्यानंतर संधू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. संधू यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, हा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कलम ४१अ अंतर्गत हजर राहण्याची नोटीस बजावून माजी डीएसपीला असुरक्षित स्थितीत आणण्यात आले आहे.
ज्येष्ठ वकिलांनी असा युक्तिवादही केला की, त्यावेळी संधूला बिश्नोईपर्यंत पोहोचता येत नव्हते आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम संरक्षण मिळाले आहे. यावर न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले की, ते प्रेसचे लोक आहेत. तुम्ही प्रभारी होता. मुलाखतीसाठी ते तुरुंगात कसे गेले? तुम्ही उच्च न्यायालयात हजर राहावे. मुख्य याचिका ३ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी सूचीबद्ध असल्याने, सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा मागे घेण्यात आला.
दरम्यान, मार्च २०२३ मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने कोठडीत असताना दिलेल्या दोन मुलाखती एका वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आल्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने तुरुंगाच्या आवारात कैद्यांकडून फोन वापरल्याची स्वतःहून दखल घेतली आणि बिश्नोईच्या मुलाखतीची दखल घेतली.