
Mahadev Betting App Scam : सौरभ चंद्राकरला 8 दिवसांची सीबीआय कोठडी; 12 नोव्हेंबरला पुन्हा न्यायालयात हजर करणार
महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप घोटाळ्यातील (Mahadev Betting App Scam) मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. बुधवारी (ता. 4) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. आता चौकशीसाठी चंद्राकरला दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नेण्यात येणार असून, 12 नोव्हेंबरला त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सुनावणीवेळी अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) अधिकारी आणि वकीलही उपस्थित होते. ईडीनेदेखील सौरभ चंद्राकरच्या कोठडीची मागणी केली आहे. मात्र, चंद्राकरचा वकील तुषार गिरी यांनी सीबीआयच्या रिमांड याचिकेला विरोध केला आणि ती अनुचित असल्याचे सांगितले. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या कथित ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्यातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला सीबीआयने मंगळवारी दिल्लीहून रायपूरला आणले होते. ओमानमधून प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारे त्याला भारतात आणण्यात आले. त्यापूर्वी सोमवारी दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर सीबीआयच्या ताब्यात दिले होते.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला भारतात आणण्यात आल्याचे सांगितले. सीबीआयच्या चौकशीत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत, पक्षाने स्वतःच्या हितासाठी लोकशाही कमकुवत केल्याचा आरोप केला.
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी पत्रकार परिषदेत सहआरोपी रवी उप्पल आणि शुभम सोनी अद्याप फरार असल्याचा दावा केला. शुभम सोनी कुठे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 2023 च्या निवडणुकीदरम्यान महादेव अॅपशी संबंधित व्हिडिओ त्यानेच प्रसिद्ध केला होता, असे बैज म्हणाले.
मागील काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकरणात 72 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक छापे टाकून अटकसत्रही राबवण्यात आले होते, असा दावा बैज यांनी केला.
यापूर्वी सौरभ चंद्राकरच्या वकिलांनी त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. ओमानच्या न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत, भारताच्या विनंतीला केवळ ईडीच्या प्रकरणात मंजुरी मिळाली होती, सीबीआयच्या प्रकरणात नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे ज्या प्रकरणांच्या आधारे प्रत्यार्पण झाले, त्याच प्रकरणांमध्ये कारवाई करता येईल, असे वकिलांचे म्हणणे आहे.
महादेव बेटिंग अॅपशी संबंधित प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे. छत्तीसगड सरकारने या प्रकरणातील 13 एफआयआर सीबीआयकडे सोपवल्या होत्या. त्यापैकी दोन प्रकरणांत आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास सुरू असून, सौरभ चंद्राकरविरोधात अभियोजन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महादेव अॅपचा प्रचार केला. ऑनलाइन सट्टेबाजीसाठी अनेक प्लॅटफॉर्म तयार केले आणि त्यातून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांद्वारे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवला.
सौरभ चंद्राकर 2023 पासून दुबईत फरार होता. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. 8 जुलै रोजी ओमानच्या रॉयल पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर 116 दिवसांनी, 1 नोव्हेंबर रोजी त्याला भारतात आणण्यात आले.
Ans: सौरभ चंद्राकरला न्यायालयाने आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
Ans: त्याला 12 नोव्हेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Ans: त्याला ओमानमधून प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारे भारतात आणण्यात आले.