गाझीपूर : उत्तर प्रदेशातील राजकारणातून (Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे. गुंड आणि माजी आमदार मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) गाझीपूरच्या (Ghazipur Court) एमपी-एमएलए न्यायालयाने गँगस्टर ॲक्ट प्रकरणात दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली (10 Years Jail) असून, 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच मुख्तार याचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी (Afzal Ansari) यांनाही न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
गाझीपूरमध्ये मुहम्मदाबादमधील बसनिया चट्टी येथे तत्कालीन भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह 7 जणांची हत्या 2005 मध्ये करण्यात आली होती. या प्रकरणी 2007 साली अफजल आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर गँगस्टर अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गाझीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अफजल अन्सारी या प्रकरणात जामिनावर तुरुंगाबाहेर होते. मात्र, शनिवारी या प्रकरणावर सुनावणी करताना गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने अफजल अन्सारी यांना दोषी ठरवले. न्यायालयाने अफजलला 4 वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे विद्यमान खासदार असलेल्या अफजल अन्सारी यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने आता त्यांची खासदारकी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण कायद्यानुसार, ज्या लोकप्रतिनिधीवर कारवाई होऊन शिक्षा झाली तर त्या लोकप्रतिनिधीचे पद रद्द केले जाऊ शकते, अशी तरतूदही आहे.
राहुल गांधी यांच्यानंतर अफजल अन्सारी यांचा नंबर
यापूर्वी मोदी आडनावावरून आक्षेपार्ह विधान केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधी यांच्यानंतर आता अफजल अन्सारी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचीही खासदारकी जाणार असल्याचे म्हटले जात आहे.