मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. आरोपी मनोज साने याने पोलिसांना सांगितले की, माझी लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिने आत्महत्या केली होती. त्यामुळे मी अटकेच्या भीतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले. त्यानंतर ते कुत्र्यांना खाऊ घातले.
मृत सरस्वती अनाथ होत्या. त्यांनी अहमद नगर येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रमातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते.
दरम्यान या आश्रमातील कर्मचारी अनु साळवे यांनी एका वृतवाहिनीला सांगितले की, सरस्वती आरोपीला मामा म्हणायची. ती सांगायची की, माझे मामा खूप श्रीमंत आहेत. त्यांची कापड गिरणी आहे. दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून यायचे.
दोघेही मीरा रोड परिसरातील आकाशगंगा इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील भाड्याच्या फ्लॅटमध्ये 3 वर्षांपासून राहत होते. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची खबर इमारतीतील रहिवाशांनी बुधवारी पोलिसांना दिली होती. त्यानंतर क्रौर्याची परिसीमा ओलांडणारे हे हत्याकांड उजेडात आले.
आरोपी 4 दिवस कुत्र्यांना चारत होता
सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी गत 2-3 दिवसांपासून कुत्र्यांना काहीतरी खाऊ घालत होता. आम्ही आरोपाला असे करताना यापूर्वी केव्हाच पाहिले नव्हते.
पोलिसांनी आरोपी मनोज साने याला मीरा-भाईंदर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.