2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी मोदी सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. सरकार ही मदत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये देते. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आता या योजनेच्या रकमेत मोदी सरकार वाढ करण्याची शक्यता आहे. ही रक्कम 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
…तर तिजोरीवर 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण
या योजनेला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास तिजोरीवर 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण येईल. तर मार्च 2024 पर्यंत या योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. पण अर्थमंत्रालयाचे प्रवक्ते नानू भसीन यांनी याप्रकरणात कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला. भारतात गेल्या पाच वर्षात पावसाने हात आखडता घेतला आहे. यावर्षी तर सर्वाधिक परिणाम दिसून आला. त्यामुळे पिकांच्या उत्पादन घटले आहे. डिसेंबर 2018 पासून सबसिडीचा कार्यक्रम सुरु झाल्यापासून मोदी सरकारने 11 कोटी लाभार्थ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपये वाटप केले आहेत.
अर्थसंकल्पात होणार घोषणा ?
1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालये आणि विभागांशी सल्लामसलत सुरू केली आहे.