Mohan Bhagwat News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीविषयी अप्रत्यक्षपणे भाष्य केले होते. “७५ वर्षांचे वय झाल्यानंतर कार्य थांबवावे आणि इतरांना संधी द्यावी,” असे भागवतांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे निवृत्तीची आठवण करून दिली जात असल्याचा सूर उमटू लागला. मोहन भागवतांच्या या विधानानंतर भाजपच्या अंतर्गत उलथापालथी होऊ लागल्या आहेत. अशातच मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या एका आमदाराने थेट विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान बनवा,’अशी मागणी केली आहे.
कर्नाटक काँग्रेसचे सागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्णन यांनी आरएसएसकडे नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या निवृत्तीविषयक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यानंतर गडकरी यांनाच पंतप्रधान करावे, तेच या पदासाठी योग्य आहेत,” असे गोपालकृष्ण यांनी म्हटले.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात, “७५ वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतर नेत्यांनी सरकारी पदांवरून निवृत्त व्हावे,” असे मत व्यक्त केले होते. या विधानामागे अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांनाच उद्देशून इशारा असल्याचे काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मोदी यांचे यावर्षीच वय ७५ वर्षे पूर्ण होत आहे.
बेलूर गोपालकृष्णन म्हणाले की,”७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपने येदियुरप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते. आता मोदी यांच्यावरही तेच मापदंड लागू करायला हवेत. पण नितीन गडकरी यांना देशातील गरीब जनतेची चिंता आहे. आज देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरिबांची संख्या वाढतच आहे. देशाची संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हाती एकवटत आहे. अशा परिस्थितीत गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय ठरतील. भाजप हायकमांडने यावर गांभीर्याने विचार करावा.”
1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत असलेल्या ‘अनधिकृत निवृत्ती धोरणा’बाबत चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. भाजपमध्ये ७५ वर्षांनंतर नेत्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे, असा एक अलिखित नियम मानला जातो. मोदीही आता त्या वयोगटात दाखल होत असल्याने, ते या प्रथेनुसार मोदी निवृत्ती घेतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच केलेले एक वक्तव्य अधिकच चर्चेत आले आहे. त्यांनी थेट मोदींचा उल्लेख केला नसला तरी, एका ऐतिहासिक व्यक्तीच्या विचारांचा संदर्भ देत, विशिष्ट वयानंतर व्यक्तींनी निवृत्त व्हावे, असे मत मांडले. काँग्रेसने या विधानावर तात्काळ प्रतिक्रिया देत, भागवतांचा संदेश हा अप्रत्यक्षरित्या मोदींनाच उद्देशून असल्याचा दावा केला आहे. मोदी हे दीर्घकाळ संघाशी निगडित राहिल्यामुळे, संघप्रमुखांचे वक्तव्य केवळ तात्त्विक नसून, एका सूचक सल्ल्यासारखे आहे, असे काँग्रेसने सूचित केले आहे.