
भाजपला सत्तेचा अहंकार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना...; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी, गणोरी, बाजार सावंगी व नागव या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचारसभा घेतल्या. यावेळी जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, छत्रपती संभाजी नगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर , प्रदेश सचिव सुदामराव मते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगन्नाथराव पवार, फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला देशातील लोकशाही, संविधान संपवायचे आहे. एक देश व एक पक्ष ठेवायचा आहे, त्यामुळे विरोधी पक्षाला संपवण्याचे काम ते करत आहेत. निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख, हे वगनाट्य जोरात सुरु असून पोलीसांच्या मदतीने विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जातात, निवडणूक आयोगही सत्ताधारी पक्षासाठीच काम करत आहे. या परिस्थितीतही काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नासाठी, लोकशाही व संविधान अबाधित ठेवण्यासाठी लढत आहे. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसला चांगला कौल दिला आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे.
भाजपाला शेतकरी, महिला, कामगार, तरुणांचे प्रश्न दिसत नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतमालाला भाव मिळत नाही, नोकरी नाही म्हणून गावोगावी तरुण चिंतेत आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे पण भाजपा सरकार मात्र त्याकडे लक्ष न देता सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या मुद्द्यांना ऐरणीवर आणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाचा हा डाव ओळखा, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.