पुढील 10 वर्षात देशात अडीच ते तीन लाख कोटींचे बोगदे, नितीन गडकरी यांची माहिती (फोटो सौजन्य-X)
मुंबई : भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील १० वर्षांत २.५ ते ३ लाख कोटींच्या टनेल (भुयारी मार्ग) प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले की, “भारत पायाभूत सुविधांच्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहे. टनेलिंग केवळ प्रवासासाठी नाही, तर सुरक्षा, पर्यावरणीय संवर्धन आणि टिकावू विकासासाठीही अत्यंत गरजेचे आहे. आपण या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला पाहिजे. टनेल बांधणीचा खर्च कमी करताना गुणवत्ता कायम ठेवावी लागेल. यासाठी CNG, इथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक इंधनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे. जुन्या टनेलिंग मशिन्सचे पुनर्निर्माण करणे, युरोपातील ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्पेनमधून वापरलेल्या यंत्रणा आयात करणे आणि पुढे जाऊन भारतातच त्या उत्पादनात आणणे, ही दिशा असली पाहिजे. भारतात भूगर्भ रचना वेगवेगळी असल्याने संशोधन आणि प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. यासाठी माझं मंत्रालय यंत्रसामग्री, प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधनांसाठी सहकार्य करायला तयार आहे.”
या कार्यशाळेत भारत, युरोप, यूके आणि यूएस येथील तज्ज्ञ सहभागी झाले असून इंटरनॅशनल टनेलिंग असोसिएशन (ITA-CET) च्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स फॉर टनेलिंग अँड अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन (Center of Excellence for Tunnelling and Underground Construction) चे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र सँडविक (Sandvik) आणि टाटा प्रोजेक्ट्स लि. (Tata Projects Ltd.) यांच्या सहकार्याने उभारण्यात आले असून, यात Tunnel Monitoring Laboratory आणि Drilling & Blasting Laboratory यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टनेलिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितलं की, “अनेक वेळा डिझाईन केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवताना कामगार योग्य प्रशिक्षणाअभावी धोका पत्करतात. हे सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स जागतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे. MIT-WPU मध्ये मी विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये एक कौटुंबिक नातं अनुभवतो. दोन वर्षांपूर्वी येथे शिकलेले विद्यार्थी आज देशाची पायाभूत घडण घडवत आहेतहे विशेष कौतुकास्पद आहे.”
या कार्यशाळेत Building Information Modeling (BIM), लेझर स्कॅनिंग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यासह हिमालयासारख्या दुर्गम भूभागांतील बांधकामासाठी आवश्यक कौशल्यांवर चर्चा झाली. यावेळी विद्यापीठाने टनेलिंग अवार्ड्स २०२५ (MIT-WPU Tunnelling Awards 2025) चे आयोजन करण्यात आले. यात TATA Projects Ltd., L&T, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे लिमिटेड (NMSCEL), J. Kumar Infra Projects Ltd. यांना त्यांच्या कामाबद्दल विविध पुरस्कार देण्यात आले.