चिराग पासवान यांच्या रणनितीने JDU च्या गोटात अस्वस्थता; बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांचं टेन्शन वाढलं
बिहार विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जेडीयूमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. एनडीएकडून आधीच मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांचे नाव घोषित करण्यात आले असताना चिराग यांच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, अशी चिंता जेडीयूचे नेते व्यक्त करत आहेत.
Gopal Italia : गुजरातमध्ये विजयी झालेले आपचे आमदार नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर
चिराग पासवान का लढवणार निवडणूक?
चिराग पासवान केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असतानाही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा उद्देश काय, असा सवाल जेडीयूच्या गोटात विचारला जात आहे. जेडीयूच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग यांचा हा निर्णय व्यक्तिगत असल्याचं मानलं जात आहे. यामागे जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा दबाव तयार करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.
राजगीरमध्ये शक्तिप्रदर्शनाची तयारी
चिराग पासवान 29 जून रोजी नितीश कुमार यांच्या बालेकिल्ल्यात राजगीरमध्ये ‘बहुजन भीम संकल्प समागम’ आयोजित करत आहेत. सुमारे दोन लाख लोकांच्या उपस्थितीचा दावा करण्यात येत असून, त्यामधून चिराग आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच बाब जेडीयूच्या अस्वस्थतेचे मुख्य कारण आहे. चिराग यांच्या या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर आणि पक्षांतर्गत अस्थिरता निर्माण होऊ शकते, असं जेडीयुचं म्हणणं आहे.
चिराग मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?
राजकीय विश्लेषकांचे मते, चिराग पासवान यांनी जर स्वतः विधानसभा निवडणूक लढवली, तर त्याचा सरळसरळ अर्थ मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा असा होतो. मात्र, एनडीएमध्ये एलजेपीला मिळणाऱ्या जागांची संख्या ३० पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवून मुख्यमंत्री पदावर दावा करणं कठीण आहे.
दरम्यान चिराग पासवान यांना जागा मिळाल्या तर ते एनडीए सोबत राहतील का? अशी शंका आहे. महागठबंधनमध्ये मुख्यमंत्री होणं अवघड आहे, कारण तिथे तेजस्वी यादव आधीच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. शिवाय, तिथेही चिराग यांना मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक इतक्या जागा मिळतील, याची शाश्वती नाही.
तर नुकसान चिराग पासवान यांचंच
एनडीएतून बाहेर पडून चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे किंवा प्रशांत किशोर यांच्यासोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याचा पर्याय निवडला, तरी त्या आघाडीत नेतृत्व कोण करणार, याचाही प्रश्न असणार आहे. याशिवाय, मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या नुकसानीमागे चिराग यांना जबाबदार धरलं गेलं होतं. त्यामुळेच यंदा जेडीयू त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Bihar Election 2025 : गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?
मात्र, या वेळी परिस्थिती भिन्न आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार जेडीयूच्या पाठिंब्यावर चालते आणि बीजेपी-जेडीयू यांच्यातील संबंध आधीपेक्षा अधिक घट्ट आहेत. त्यामुळे चिराग पासवान जर एनडीएपासून दुरावले, तर सर्वात मोठे नुकसान त्यांचेच होईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.