आता रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार? जाणून घ्या नेमका निर्णय काय?
नवी दिल्ली : लांब पल्ल्यासाठी सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. त्यानुसार, भारतीय रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक सेवा-सुविधा दिल्या जात आहेत. त्यातच आता रेल्वेच्या सध्याच्या नियमानुसार, एखादे तिकीट बुक केले असेल आणि ते वेटिंग लिस्टवर दिसत असेल, तर रद्द झाल्यानंतरही पूर्ण परतावा दिला जात नाही. पण, आता यामध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे.
भारतीय रेल्वे आता कॅन्सल तिकिटांवर प्रवाशांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. भारतीय रेल्वे वेटिंग तिकीट रद्द करण्यावरील क्लर्केज शुल्क (भारतीय रेल्वे अपडेट्स) काढून टाकण्याची तयारी करत आहे. प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वेकडून हा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. आतापर्यंत, ऑनलाईन वेटिंग तिकीट रद्द केल्यावर प्रति प्रवाशाकडून ३० ते ६० रुपये शुल्क आकारले जात होते. हे चार्ज लवकरच मागे घेतले जाणार आहेत.
हेदेखील वाचा : आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर आधी ‘ही’ माहिती वाचा
स्लीपर क्लासमध्ये हे शुल्क 60 रुपये आणि तिसऱ्या, दुसऱ्या किंवा पहिल्या वर्गात 60 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर या शुल्काविरुद्ध आयआरसीटीसीकडे तक्रार केली होती. त्यानंतर हा मुद्दा रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. सध्या हा प्रस्ताव मंत्रालयात चर्चेत आहे.
किती पैसे कापले जातात
तिकीट बुकींग आयआरसीटीसी पोर्टलवरुन केल्यानंतर ते प्रतिक्षा यादीवर असेल तर ऑटोमेटड रद्द होते. शुल्क कापून उर्वरित रक्कम आपल्या खात्यात येते. त्यानंतर क्लर्क चार्जशिवाय इतर काही शुल्क कापून रक्कम दिली जाते. सध्या 2S श्रेणीतील तिकीट रद्द झाल्यावर 30 रुपये शुल्क लागते. शयनयान श्रेणीत हे शुल्क 60 रुपये आहे. तसेच थर्ड एसीसह इतर क्लासमध्ये हे शुल्क 60 रुपये प्लस जीएसटी आहे.
अनेक वेळा झाली यावर चर्चा
रेल्वेच्या कॅन्सल होणाऱ्या तिकिटांवर लावण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात दीर्घकाळापासून चर्चा होत आहे. कॅन्सल तिकिटांसाठी वेगवेगळ्या श्रेणीप्रमाणे हे शुल्क ३० ते ६० रुपये आहे. जे तिकीट आम्ही स्वत: रद्द करत नाही आणि ते प्रतिक्षा यादीवर असल्यामुळे रद्द होते, त्यावर रेल्वेकडून शुल्क का आकारले जाते? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावर दीर्घकाळापासून विचारही सुरु होता.