नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, नौदलाने आपली ताकद आणि सामरिक क्षमता दाखवली आणि अरबी समुद्रात पाकिस्तानवर सतत दबाव कायम ठेवला. शेजारील देशाला युद्धबंदी करण्यास भाग पाडण्यात नौदलाने महत्त्वाची भूमिका बजावली. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय संरक्षण दलांच्या संयुक्त ऑपरेशनल योजनेनुसार, भारतीय नौदलाचे कॅरियर बॅटल ग्रुप, सरफेस फोर्स, पाणबुड्या आणि एव्हिएशन मालमत्ता तात्काळ समुद्रात पूर्ण युद्ध तयारीत तैनात करण्यात आल्या होत्या. अशी माहिती नौदलाच्या प्रवकत्यांकडून देण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ ९६ तासांच्या आत भारतीय नौदलाने अरबी समुद्रात व्यापक युद्धसराव करत शस्त्रास्त्र चाचण्या घेतल्या. या मोहिमेदरम्यान नौदलाने रणनीती आणि कार्यपद्धतींचे पुनर्मूल्यांकन करून त्यामध्ये सुधारणा केल्या. या सरावात निवडक लक्ष्यांवर अचूकपणे विविध वॉरहेड्स टाकण्यात आले. यावेळी क्रू सदस्य, शस्त्रास्त्र साठा, उपकरणे आणि प्लॅटफॉर्म्स यांची कार्यक्षमता व तयारी पुन्हा एकदा काटेकोरपणे तपासण्यात आली.
रविवारी ऑपरेशन सिंदूर बद्दल पत्रकार परिषदेत बोलताना नौदलाचे महासंचालक (DGNO) व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद म्हणाले की, नौदल 9 मे च्या रात्री पाकिस्तानच्या सागरी सीमेत प्रवेश करण्यासाठी आणि त्यांचे लष्करी तळ आणि कराची बंदरासारख्या प्रमुख प्रतिष्ठानांना नष्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज करण्यात आले होते. नौदल फक्त सरकारच्या आदेशांची वाट पाहत होते.
उत्तर अरबी समुद्रात नौदलाची सज्जता; पाकिस्तानवर दबाव
ते म्हणाले की, भारतीय नौदल उत्तर अरबी समुद्रात पूर्णतः सज्ज अवस्थेत तैनात करण्यात आले आहे. समुद्र तसेच जमिनीवरील निवडक लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्याची तयारी आणि क्षमता नौदलाकडे असून, सध्या प्रतिबंधात्मक स्थितीत आहे.
या तैनातीमुळे पाकिस्तानी नौदल आणि हवाई दलाला त्यांच्या बंदरांमध्ये किंवा किनाऱ्यालगतच संरक्षणात्मक भूमिकेत राहावे लागत आहे. तणाव नियंत्रण यंत्रणेचा एक भाग म्हणून, नौदलाने बळाचा वापर करण्याचे नियोजन लष्कर आणि हवाई दलाच्या समन्वयाने आधीच केले होते. लष्कर आणि हवाई दलाच्या गतिमान कृती आणि भारतीय नौदलाच्या समुद्रात प्रचंड ऑपरेशनल क्षमतेमुळे शनिवारी पाकिस्तानकडून तात्काळ युद्धबंदीची विनंती करण्यात आली.
पाक लष्कराचा खुलासा
पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानच्या ताब्यात कोणताही भारतीय पायलट नाही. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर पसरलेल्या अशा सर्व बातम्या अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. त्यांनी यावेळी हेही नमूद केले की, एका पाकिस्तानी लढाऊ विमानाला किरकोळ नुकसान झाले असून त्यासंदर्भात सविस्तर माहिती देणे सध्या शक्य नाही.
पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी पाकिस्तानने भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून लष्करी मोहीम राबवली असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, ही कारवाई “अचूक, संतुलित आणि संयमी” होती. पाकिस्तानने २६ भारतीय लष्करी तळांवर, त्यात हवाई दल आणि हवाई तळांचा समावेश होता, लक्ष्य साधल्याचा दावा त्यांनी केला.