जीएसटी २.० लागू झाल्यावर पंतप्रधान मोदींचे जनतेला पत्र (Photo Credit- X)
PM Modi’s Letter: देशभरात आज, २२ सप्टेंबरपासून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या मुहूर्तावर जीएसटीचे नवीन दर लागू झाले आहेत. या नवीन बदलांमध्ये पूर्वीचे दोन टॅक्स स्लॅब हटवण्यात आले असून, अनेक वस्तूंच्या दरांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बदलांना ‘जीएसटी बचत उत्सव’ असे संबोधले असून, हे सर्वसामान्यांसाठी ‘दुहेरी धमाका’ असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी आज देशाला उद्देशून एक पत्रही लिहिले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शक्तीच्या उपासनेचा पर्व असलेल्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी सणासुदीच्या काळात आम्हाला आणखी एक भेट मिळत आहे. २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स’ मुळे देशभरात ‘मोठी बचत मोहीम’ सुरू झाली आहे. या सवलतींमुळे शेतकरी, महिला, तरुण, गरीब, मध्यमवर्ग, व्यापारी आणि लघु उद्योजकांना फायदा होणार आहे.”
This festive season, let’s celebrate the ‘GST Bachat Utsav’! Lower GST rates mean more savings for every household and greater ease for businesses. pic.twitter.com/QOUGWXrC3d — Narendra Modi (@narendramodi) September 22, 2025
पंतप्रधानांनी पत्रात सांगितले की, नवीन जीएसटी सुधारणांचे वैशिष्ट्य असे आहे की, आता प्रमुख रूपाने फक्त दोनच टॅक्स स्लॅब असतील. रोजच्या गरजेच्या वस्तू जसे की, खाद्यपदार्थ, औषधे, साबण, टूथपेस्ट आणि अनेक सामान्य वस्तू आता एकतर करमुक्त असतील किंवा ५% च्या सर्वात कमी स्लॅबमध्ये येतील. घर बांधणे, गाडी खरेदी करणे, बाहेर जेवण करणे किंवा कुटुंबासोबत सुट्ट्या घालवणे आता सोपे होणार आहे. हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीही आता शून्य करण्यात आला आहे.
मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीला मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट
पंतप्रधानांनी ‘नागरिक देवो भव:’ हे आपले मंत्र असल्याचे म्हटले आहे. “गेल्या ११ वर्षांतील आमच्या प्रयत्नांमुळे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आता देशात एक नियो मिडल क्लास तयार झाला आहे आणि त्याला अधिक मजबूत केले जात आहे. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर घेतला जात नाही. आयकर सवलती आणि नवीन जीएसटी सुधारणा एकत्र केल्यास, देशवासियांचे वार्षिक जवळपास २.५ लाख कोटी रुपये वाचणार आहेत.”
मोदींनी पत्रातून स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहनही केले आहे. “देशाने २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे आणि ते साध्य करण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. नवीन जीएसटी सुधारणांमुळे आत्मनिर्भर भारत अभियानालाही गती मिळेल. कोणत्याही ब्रँडची किंवा कोणत्याही कंपनीची वस्तू असो, जर ती भारतीय श्रमिक आणि कारागिरांच्या मेहनतीने बनलेली असेल, तर ती स्वदेशी आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या देशातील कारागिरांनी, मजुरांनी आणि उद्योगांनी बनवलेली वस्तू खरेदी करता, तेव्हा तुम्ही अनेक कुटुंबांच्या उपजीविकेला मदत करता आणि देशातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करता.” असे आवाहन त्यांनी केले. पत्राच्या शेवटी, त्यांनी दुकानदारांनाही स्वदेशी वस्तू विकण्याचे आवाहन केले आहे. “तुमच्या घरातील बचत वाढावी, तुमची स्वप्ने पूर्ण व्हावीत… हीच माझी इच्छा आहे,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ‘जीएसटी बचत उत्सवा’ च्या शुभेच्छा दिल्या.