
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काशीमध्ये; चार वंदे भारत गाड्यांना दाखवणार 'हिरवा झेंडा'
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना सुरुवात केली जात आहे. त्यातच भारतात ‘वंदे भारत’ रेल्वे पसंतीस उतरली आहे. अनेक मार्गांवर या गाड्या धावत आहेत. असे असताना आज काशीमधून चार ‘वंदे भारत’ गाड्या सुटणार आहेत. याला पंतप्रधान मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. मुख्यमंत्री योगी त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती दिली जात आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते आज चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या वाराणसी-खजुराहो, लखनऊ-सहारापूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू मार्गांवर धावतील. शुक्रवारी रात्री उशिरा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी रेल्वे स्थानकाला भेट दिली. वाराणसी-खजुराहो वंदे भारत ही वाराणसी, प्रयागराज आणि चित्रकूटसह देशातील काही सर्वात प्रतिष्ठित धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडणार आहे.
लखनऊ-सहारापूर वंदे भारत ही ट्रेन ७:४५ तासांत प्रवास पूर्ण करेल. या ट्रेनचा लखनऊ, सीतापूर, शाहजहानपूर, बरेली, मुरादाबाद, बिजनौर आणि सहारनपूर असा प्रवास असल्याने येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत असेल सर्वात वेगवान
फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन असेल, जी प्रवास 6:40 तासांत पूर्ण करेल. ही एक्सप्रेस राष्ट्रीय राजधानी आणि पंजाबमधील भटिंडा आणि पटियाला यांच्यातील कनेक्टिव्हिटी मजबूत करेल. दक्षिण भारतात, एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा जास्त वेळ कमी करेल, प्रवास 8:40 मिनिटांत पूर्ण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा दक्ष
पोलिस कर्मचारी बरेकाच्या सर्व प्रवेशद्वारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बरेका गेस्ट हाऊसला जोडणाऱ्या रस्त्यावर एसपीजी तैनात करण्यात आले आहेत. एसपीजीने बनारस स्टेशनच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पहिल्या प्रवेशद्वाराजवळील वाहन स्टँड देखील काढून टाकण्यात आला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कडक सुरक्षेत ईशान्य रेल्वेच्या बनारस स्टेशनवरून खजुराहोसाठी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
हेदेखील वाचा : Bihar Election 2025: तेजस्वी यादव की नितीश कुमार..; काय असतील Exit Pollचे अंदाज? राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला